बचतगटाचे नाव घेतले की पापड-कुरडया, लोणची-मसाले किंवा फार फार तर हाताने शिवलेल्या कापडी पिशव्या आणि पर्स यापेक्षा इतर काही फारसे आठवत नाही. पण आता हे लहान उत्पादक हळूहळू बदलताना दिसताहेत. ग्राहकांच्या बदललेल्या आवडीनिवडी लक्षात ठेवत आपले पारंपरिक वैशिष्टय़ जपण्याचा प्रयत्न बचतगटांकडून होताना दिसत आहे. याचेच प्रतिबिंब ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भीमथडी जत्रेत गुरुवारी बघायला मिळाले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी या जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. स्वयंपाकाची मातीची भांडी, साध्या शेवयांऐवजी स्ट्रॉबेरी किंवा आंब्याच्या स्वादाच्या शेवया, ग्राहकांच्या जुन्या कपडय़ांपासून आणि जुन्या जीन पँट्सपासून शिवून दिलेल्या पिशव्या आणि आपापल्या गावची खासियत असलेल्या पदार्थासाठी लागणारे, सहसा बाहेर न मिळणारे मसाले असे काही नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ, अशा वस्तू लहान उत्पादकांकडून विक्रीस ठेवण्यात आल्या असून, त्या शहरी ग्राहकांना आकर्षित करत आहेत. पेपर क्विलिंगचे दागिने, लाकडी खेळणी, वेगवेगळय़ा जातींचे सेंद्रिय तांदूळ, लोकरीपासून बनवलेले गालिचे, घोंगडय़ा आणि बस्करे, साजूक तूप, फिके पेढे अशा वस्तू बचतगटांकडे दिसत आहेत. लोणची-मसाल्यांमध्येही काही नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. येसूर मसाला, खान्देशी मसाला असे काही वैशिष्टय़पूर्ण मसाले, ओली लसूण चटणी, खाकऱ्याच्या स्वरूपातला कोरडा डोसा, टोफू, खरवस, वेगवेगळय़ा प्रकारचे मध असे पदार्थही विक्रेत्यांनी आणले आहेत.
यंदा ‘भीमथडी’त इतर राज्यांमधील कारागिरांचीही काही दालने प्रदर्शनात असून, त्यात आंध्र प्रदेशमधील ‘लेदर पपेट’ आणि ‘लेदर लँपशेड्स’, राजस्थानची खासियत असलेली सोन्याचा वर्ख, रंगीत दगड आणि भाज्यांपासून बनवलेले रंग यापासून काढलेली चित्रे, मौल्यवान दगडांवर मीनाकारी करून बनवलेली पेंडंट्स, उबदार रंगीबेरंगी जाकिटे, हरयाणाच्या मोजडय़ा, पश्चिम बंगालच्या खास कलकत्ता साडय़ा, मध्य प्रदेशच्या सिल्कच्या साडय़ा आणि दुपट्टे, कर्नाटकचे धातूचे दागिने या वस्तूही गर्दी खेचत आहेत.
खवय्यांसाठीही रेलचेल!
भरीत-भाकरी, शेंगोळी, पाटवडी, अख्खा मसूर-भाकरी, कण्हेर पोखरी आमटी आणि भाकरी, शेवभाजी, शेवगा-भाकरी, आगरी मसाल्याची मच्छी, मडक्यातील मटण व चिकन, सुके मटण, आप्पे, डाळवडा, पुरणाचे मांडे, हुरडा धपाटे, उकडीचे मोदक, बिगर पाण्याची कांदा भजी, खपली गव्हाची खीर, कढी-फुणके, वरण-बट्टी व वांग्याची भाजी अशा विविध पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठीही खवय्यांची गर्दी होत आहे.