News Flash

महापालिकेत बाकांच्या खरेदीतही घोटाळा

स्टीलच्या या बाकाची खुल्या बाजारातील किंमत चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे.

सहा हजारांच्या बाकाची खरेदी पंधरा हजाराला

महापालिकेडून शहरातील रस्ते आणि उद्यानात बसविण्यासाठी स्टीलचे खांब आणि स्टीलचे बाक खरेदी करण्यात आले असून या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. बाजारपेठेत पाच ते सहा हजार रुपयांना मिळणारा बाक महापालिकेने तब्बल पंधरा हजार रुपयांना खरेदी केला आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर स्टीलचे खांब बसविले जात आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कडेला आणि उद्यानांमध्ये स्टीलचे बाक बसविले जात आहेत. स्टीलच्या या बाकाची खुल्या बाजारातील किंमत चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे. महापालिकेचा खरेदी दर मात्र पंधरा हजार आठशे शहात्तर रुपये इतका आहे. त्यामुळे महापालिका या बाकांची खरेदी तिप्पट दराने करत असल्याचे दिसत आहे. स्टीलच्या खांबाची खुल्या बाजारातील किंमत दीड हजार रुपयांपर्यंत आहे. महापालिकेने मात्र ते ठेकेदारांकडून साडेसात हजार रुपयांना एक याप्रमाणे खरेदी केले आहेत. त्यामुळे या खरेदीत मोठा घोटाळा होऊन महापालिकेचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून महापालिका याच दराने बाकांची खरेदी करत आहे. या बाबत पालिका प्रशासनाकडे लेखी माहिती मागितली होती. मात्र जी माहिती दिली तीही चुकीची आहे. त्यात प्रभाग क्रमांक वीसमध्ये स्टीलचे खांब बसविले नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र त्या प्रभागात शंभर पेक्षा अधिक संख्येने ते बसविले गेले आहेत. अन्य प्रभागांमध्येही ते अशाच प्रकारे मोठय़ा संख्येने व नगरसेवकांची मागणी नसतानाही बसवण्यात आले आहेत. तरीही चुकीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली. ही खरेदी कशी करण्यात आली, नगरसेवकांची मागणी होती का, तुलनात्मक दरांचा तक्ता आहे का, असे आणखी काही प्रश्न प्रशासनाला विचारले होते, मात्र त्यांची उत्तरे मिळाली नाहीत असेही बागवे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:29 am

Web Title: benches purchasing scam in pmc
टॅग : Pmc
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सोमवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक
2 सदुंबरे गावातील मुलीच्या खुनाचे गूढ उकलले
3 महाविद्यालयांच्या आवारातील दलालांपासून सावध राहा!
Just Now!
X