आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक केल्याचे चित्र पिंपरीत बुधवारी पुन्हा दिसून आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे लोटांगण घालणारे पोलीस इतर पक्षीयांना मात्र नियमांचा बडगा दाखवून कठोर वागणूक देत होते. राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘आप’चे उमेदवार मारूती भापकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सोमवारी लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा मोठय़ा संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पिंपरी पालिका मुख्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हा दोन्ही वेळी पोलिसांची वेगवेगळी भूमिका दिसून आली. बुधवारी त्यावर कळस गाठला गेला. नार्वेकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी अजितदादा, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते हजर होते. इतर उमेदवारांना केवळ पाच व्यक्ती नेण्याची परवानगी देणाऱ्या पोलिसांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसमोर लोटांगण घातले. २५ हून अधिक नेते व त्यांचे कार्यकर्ते पालिका मुख्यालयात दिमाखात आले होते. त्यांना पोलिसांनी कोणताही अटकाव केला नाही. बडे नेते आले, तेव्हा कोणालाही पालिकेत सोडण्यात आले नाही. ते बाहेर पडताना पोलीस अधिकारी त्यांच्या पुढे-पुढे करण्यात आणि वाकून नमस्कार करताना दिसत होते. स्थानिक नेते पालिकेतच रेंगाळत होते. मात्र, पोलीस चुप्पी साधून बसले होते. त्यानंतर, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या भापकरांना नियमाचा बडगा दाखवत १०० मीटर अंतरावरून केवळ पाचच व्यक्ती सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली. या दुजाभावामुळे ते संतापले. त्यांची व पोलिसांची वादावादी झाली. याप्रकरणी भापकरांनी तक्रार केली असून शासकीय व पोलीस यंत्रणा राष्ट्रवादीला मदत करत असल्याचे त्यात म्हटले आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजितदादांसह हर्षवर्धन पाटील यांच्यावर कारवाई करावी, तसेच पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेबद्दल जाब विचारण्यात यावा, अशी मागणी भापकरांनी केली आहे.