भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शिवाय, या ठिकाणी राज्यभरातून मोठ्यासंख्येने नागरिक दाखल होत असतात. मात्र, १ जानेवारी २०१८ रोजी या ठिकाणी हिंसाचार उफळला होता. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी यंदा शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे व हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी केली आहे. २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत त्यांना पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमाच्या निमित्त प्रशासकीय तयारीच्या आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी भिडे व एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या बैठकीस पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे आदींची उपस्थिती होती.

कार्यमक्रम सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन केले गेले आहे. प्रशासनास नागिरकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.