भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर शहरासह जिल्ह्य़ात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि बुधवारी काही राजकीय पक्षांनी दिलेली महाराष्ट्र बंदची हाक या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भीमा कोरेगाव येथे दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. मात्र, बुधवारी सर्व शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भीमा कोरेगाव येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो. त्यानुसार ४ जानेवारी रोजी भरणारा आठवडी बाजार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. तसेच हिंसाचार झालेल्या भागातील बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा सुरू करायची किंवा बंदच ठेवायची याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यात येणार आहे.

‘पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ाच्या काही भागात मंगळवारी तणाव होता. तसेच काही राजकीय पक्षांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तहसीलदार, प्रांत यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी सर्व शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत’, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी मंगळवारी दिली.

सोमवारी भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर संबंधित भागात अजूनही अडकलेल्या नागरिकांसाठी कोरेगाव, भीमा, वढू, सणसवाडी आणि शिक्रापूर गावात तलाठी कार्यालयात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना गावी पोहोचवण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेसची सेवा देण्यात येत आहे.

कोरेगाव, वढू, भीमा, सणसवाडी, पेरणे या गावात जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळाच्या पाहणीचे व पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.

घटनास्थळावर शिरूरचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) अधिकारी आणि तहसीलदार हजर आहेत. जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी राव यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी संपर्कात आहेत, असेही काळे यांनी सांगितले.

एम. फार्म.ची परीक्षा पुढे ढकलली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एम. फार्म.चा (औषधनिर्माण शास्त्र) एक पेपर बुधवारी (३ डिसेंबर) नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार होता. राज्याच्या काही भागातील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ात होणार होती. मात्र, हा पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासशाने दिली आहे.

डिक्कीचा कार्यक्रम रद्द

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या वतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती डिक्कीच्या वतीने देण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना कार्यक्रम पुढे  ढकलला

राज्य सरकारची माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती अभियानाच्या प्रारंभाचा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता बालेवाडी येथे होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले मानवंदना कार्यक्रम पुढे ढकलला

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रमणबाग शाळेच्या मैदानावर मानवंदना देण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सोसायटीच्या सर्व शाळांत बुधवारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.