हडपसर येथील काळेपडळ भागात असलेल्या निर्मलनगर टाऊनशिपमध्ये तळमजल्यावर लावलेल्या ३२ दुचाकींच्या आसनांचे कव्हर फाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. सोसायटीच्या अध्यक्षपदावरून हटविल्याने माजी अध्यक्षाने दुचाकीच्या आसनांचे कव्हर फाडल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

विलास चव्हाण (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. निर्मलनगर टाऊनशिपमधील रहिवासी दीपाली कोंडिबा मोरे (वय ३५) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण याला सन २०१३ मध्ये सोसायटीच्या चेअरमन पदावरून हटविण्यात आले होते. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला चव्हाण तेव्हापासून चिडून होता. तो सोसायटीतील रहिवाशांशी किरकोळ कारणांवरून भांडणे करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने सोसायटीच्या आवारात लावलेल्या काही दुचाकींचे नुकसान केले होते. मात्र,त्या वेळी हा वाद मिटविण्यात आला होता.

मंगळवारी मध्यरात्री डी १ इमारतीच्या आवारात चव्हाण आला. त्याने तळमजल्यावरील दिवे बंद केले आणि ३२ दुचाकींचे आसनाचे कव्हर फाडले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवासी संतप्त झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. रहिवाशांनी चव्हाण याच्यावर संशय व्यक्त केला होता. सोसायटीच्या आवारात रखवालदार नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांनी चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.