पुण्यातील हिंजवडी भागात असलेल्या लक्ष्मी चौकात एका अभियंता महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रतिभा मोहन तांबे असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

थेरगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रतिभा तांबे या हिंजवडी येथील फेज १ मध्ये असलेल्या विप्रो कंपनीत कार्यरत होत्या. आज त्या आपल्या कंपनीत एम.एच. १४ डी.बी. ७०९९ या दुचाकीवरून जात होत्या. त्याचवेळी हिंजवडीतील लक्ष्मी चौकात एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि पळ काढला.

या अपघातत प्रतिभा तांबे या गंभीर जखमी झाल्या. मात्र त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.