चार मराठी दिग्दर्शकांनी एकत्र येऊन ‘बायोस्कोप’ या चित्रपटातून चार कविता मांडण्याचा केलेला प्रयत्न, प्रकाश आमटेंवर चित्रपट करायची परवानगी मिळेल का, या प्रश्नापासून सुरू झालेला ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाचा प्रवास आणि एकाच घटनेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन सूक्ष्म तपशीलांसह टिपणारा ‘कुट्टरम कडिथाल’ हा तमिळ चित्रपट. या तीन चित्रपटांच्या माध्यमातून वेदनांची विविध रुपे सोमवारी ‘पुणे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवा’मध्ये (पिफ) उलगडली. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.

‘भळभळते हृदय हाच चार गोष्टींमधला दुवा’12piff1

‘एक होता काऊ’, ‘दिले नादाँ’, ‘बैल’ आणि ‘मित्राची गोष्ट’ हे चार लघुपट ‘बायोस्कोप’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अनुक्रमे गिरीश मोहिते, गजेंद्र अहिरे, विजु माने आणि रवी जाधव या दिग्दर्शकांनी या लघुपटांचे दिग्दर्शन केले आहेत. ‘भळभळते हृदय हाच या चित्रपटांमधील समान धागा आहे,’ असे अहिरे यांनी सांगितले. यातील ‘दिले नादाँ’ हा लघुपट विख्यात उर्दू कवी मिर्झा गालिब यांच्या ‘दिले नादाँ तुझे हुआ क्या हैं’ या रचनेवर आधारित आहे. ‘बैल’ या लघुपटाला कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘एक होता काऊ’ या लघुपटाला कवी सौमित्र यांच्या कवितांचा संदर्भ आहे. तर ‘मित्राची गोष्ट’ हा लघुपट विजय तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित असून त्यातील कविता कवी संदीप खरे यांनी लिहिल्या आहेत. ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या कविताही त्यांच्याच आवाजात या चित्रपटात ऐकायला मिळतील, असे गिरीश मोहिते यांनी सांगितले.     

‘आमीर खान प्रॉडक्शन्सलाही
प्रकाश आमटेंवर चित्रपट करायचा होता!’ 12piff2
‘प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आमीर खान प्रॉडक्शन्सला चित्रपट करायचा होता, आपल्याआधी या प्रॉडक्शन हाऊसच्या लोकांनी प्रकाश आमटे यांच्याशी संवाद साधला होता,’ असे ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘मी हेमलकसाला गेले त्याआधीच आमीर खान प्रॉडक्शन्सचे लोक प्रकाश आमटेंपर्यंत पोहोचले होते. माझे प्रॉडक्शन हाऊस त्या तुलनेत मोठे नव्हते त्यामुळे हा चित्रपट करण्याची संधी मला मिळेल याची खात्री नव्हती. पण ७-८ दिवस मी डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्याबरोबर राहिले. त्यांच्या प्रवासाविषयी त्यांना प्रश्न विचारत राहिले. परत आल्यावर आठवडाभरात प्रकाश आमटे यांचा ई-मेल मला मिळाला. त्यात त्यांनी मला चित्रपट बनवण्याची परवानगी दिली होती.’’
‘‘आधी बाबा आमटे यांच्या भूमिकेसाठी अभिनेते नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली होती. परंतु पटकथा वाचल्यावर त्यांनी प्रकाश आमटे साकारण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका केली,’’ असेही पोरे यांनी सांगितले. आगाशे म्हणाले, ‘‘मी बाबांसारखा दिसायचा प्रयत्न केला नाही. त्यासाठी वेगळी रंगभूषाही केली नाही. केवळ त्या माणसाचा पिंड काय हे मी दाखवले.’’ पोरे म्हणाल्या, ‘‘या चित्रपटाच्या प्रथम प्रदर्शनाच्या वेळी प्रकाश आमटे यांना रडू आवरले नाही. ‘माझ्या जन्मापासून तू कॅमेरा सुरू ठेवला होतास का?,’ अशी विचारणा त्यांनी मला केली. तोच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार होता.’’

‘कधीच न सांगितलेली गोष्ट हेच ‘कुट्टरम कडिथाल’चे वैशिष्टय़!’  

एका तरुण शिक्षिकेच्या हातून घडलेली चूक हा ‘कुट्टरम कडिथाल’ (द पनिशमेंट) या चित्रपटाचा गाभा आहे. एका अनपेक्षित घटनेकडे बघण्याचा विविध लोकांचा दृष्टिकोनही त्यातून प्रकट होतो. एका सामाजिक संस्थेबरोबर काम करताना आलेले अनुभव आणि शिक्षक व मुलांशी घडलेला संवाद यातून या चित्रपटाची गोष्ट सुचल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक ब्रम्हा जी. यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपल्या चित्रपटांमध्ये एखादी गोष्ट सांगताना त्या गोष्टीची एखादीच बाजू मांडली जाते. पण एका घटनेच्या अनेक बाजू असतात. ‘कुट्टरम कडिथाल’ या चित्रपटाचा विषय आधी कुठल्याच चित्रपटात हाताळला गेला नसल्याचे माझ्या लक्षात आले. हेच त्या गोष्टीचे वैशिष्टय़ ठरले. ज्या व्यक्तीच्या हातून चूक घडली ती व्यक्ती मूळची हिंसक नाही, हे दाखवताना त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील लहान- लहान तपशिलांवर भर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.’’ चित्रपटाचे संगीत आणि तमिळ गाणी हा त्याचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘तमिळ या एकाच भाषेत व्याकरण सांगीतिक रुपात आढळते. भारतीयांसाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीताला महत्त्व आहे. त्यामुळे बिगर व्यावसायिक चित्रपटांमध्ये गाणी नकोतच असे मुळीच नाही.’’