चिमण्यांवर मोबाईल टॉवरचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या वर्षी पक्षिगणनेत केला जाणार आहे. ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संघटनेतर्फे १६ ते २६ जानेवारी या कालावधीत राज्यभर ‘महापक्षिगणना’ केली जाणार आहे. यात प्रामुख्याने मानवी वस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या पक्ष्यांच्या गणनेवर भर दिला जाणार असून आपापल्या परिसरातील चिमण्यांची गणना आवर्जून करा, तसेच गणना क्षेत्रात २०० मीटर परिसरात मोबाईल टॉवर असेल तर त्याचीही नोंद करा, असे आवाहन संघटनेने पक्षिमित्रांना केले आहे.
या गणनेत आतापर्यंत पक्ष्यांच्या ३३८ जातींची नोंद झाली आहे. राज्यातील पक्ष्यांच्या प्रचलित सूचीनुसार ५४० जातींचे पक्षी नोंदवण्यात आले आहेत. संघटनेचे समन्वयक शरद आपटे म्हणाले,‘‘मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे असे म्हटले जाते. गेली दोन वर्षे आम्ही सांगलीत चिमण्यांची गणना करुन त्या बरोबरीने परिसरातील मोबाईल टॉवरचीही नोंद करत आहोत. राज्यभर पक्षिगणनेत दर वर्षी चिमण्यांच्या गणनेवर अशा प्रकारे लक्ष दिले तर मोबाईल टॉवरचा त्यांच्यावरील परिणाम कळू शकेल.’’ पक्षिमित्रांच्या गटांनी ठरावीक ठिकाणी सातत्याने गणना करणे आवश्यक आहे, तरच गणनेचा मेळ घालता येईल, असेही त्यांनी सांगितले.
महापक्षिगणनेत गणनेतील नोंदींसाठी संघटनेने एक विशिष्ट फॉर्म तयार केला असून गणनेचे अहवाल ३१ जानेवारीपर्यंत संघटनेकडे पाठवावे लागणार आहेत. १६ ते २६ तारखेदरम्यान कोणत्याही एका दिवशी ही गणना करायची आहे. आपण निवडलेल्या ठिकाणी सकाळी ६.३० ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० या वेळात दोन्ही वेळा गणना करणे आवश्यक असून जमिनीवरील, झाडाझुडपातील, पाण्यातील किंवा आकाशात उडणारे अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करावी, असे संघटनेने म्हटले आहे. या पक्षिगणनेत सहभागी होण्यासाठी कोणतीही अट नाही, तसेच संघटनेकडे नोंदणी करणे आवश्यक नाही. अधिक माहिती http://www.pakshimitra.org या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे संघटनेने कळवले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2016 रोजी प्रकाशित
पक्षिगणनेत यंदा चिमण्यांच्या गणनेवर भर!
‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संघटनेतर्फे १६ ते २६ जानेवारी या कालावधीत राज्यभर ‘महापक्षिगणना’ केली जाणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2016 at 03:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds sparrows average