मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर होताच भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. निकालाच्या दिवशी पक्षाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून मोदींचे अभिनंदन करणाऱ्या फ्लेक्सची छपाई मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पक्षाचा विजय शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये साजरा करण्याची योजना आखली जात आहे आणि काही चौकांमध्ये भव्य एलईडी स्क्रीनही उभे करण्यात येणार आहेत.
मतमोजणीच्या दिवशी काय काय करता येईल याचा विचार आणि त्यानुसार कार्यक्रमांची आखणी भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक गेले दोन दिवस करत आहेत. पक्षाचा विजय लोकांना बरोबर घेऊन साजरा करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षकार्यकर्त्यांना केले आहे. त्यांचे हे आवाहन केंद्रस्थानी ठेवून पुण्यातही तशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याची योजना आहे. निवडणूक निकालांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी बेलबाग चौकाजवळ वीस फूट उंच आणि अठरा फूट रुंद असा भव्य एलईडी स्क्रीन भाजपतर्फे लावण्यात येणार असून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे भव्य फ्लेक्सही चौकात लावले जाणार असल्याचे स्थानिक नगरसेवक हेमंत रासने यांनी सांगितले. ढोल-ताशे, फटाके, पेढे अशीही तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्वती विधानसभा मतदारसंघातील विजयोत्सव मार्केट यार्ड चौकात होणार असून तेथे पेढे वाटप केले जाणार असल्याचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. ढोल-ताशा पथकेही बोलावण्यात आली असून निकाल जाहीर होताच शहरात मोदी यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागतील.
प्रमुख चौकांमध्ये साखर वा पेढय़ांचे वाटप अशी व्यवस्था केली जाणार आहे. बेलबाग चौकात साजऱ्या होणाऱ्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि अनिल शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते प्रा. श्रीपाद ढेकणे यांनी दिली.
मतमोजणीच्या दृष्टीने काँग्रेस, मनसेने तयारी पूर्ण केली असून तूर्त तरी निकालाचा एकूण कल लक्षात घेऊनच पुढील योजना करावी, असे या पक्षांचे धोरण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्षांचे आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित असतील. त्यासाठीचे सर्व नियोजन पूर्ण झाल्याचे पक्षाचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.