• केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांचा विश्वास
  • १३ कोटी जनतेला मुद्रा योजनेचा लाभ

‘सब का साथ, सब को विकास’, हे सूत्र ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने चार वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. जगभरात भारताचा नावलौकिक उंचावण्याचे काम मोदी यांनी केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे भवितव्य उज्ज्वल राहणार आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केला. मुद्रा योजनेचा लाभ देशभरातील १३ कोटी जनतेने घेतला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग, सम्यक प्रतिष्ठान व राज्यसभा खासदार अमर साबळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथे आयोजित दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचे उद्घाटन शुक्ला यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, प्रभारी आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते.

मोदी सरकारच्या चार वर्षांतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देत शुक्ला म्हणाले, की मोदींनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे महत्त्व तसेच दबदबा वाढवला आहे. चार वर्षांत जनहिताचे अनेक निर्णय, योजना सरकारने राबवल्या. भाजपने कधीही जाती, धर्माचे राजकारण केले नाही. देशाचा पैसा घेऊन पोबारा करणाऱ्यांविरोधात काँग्रेसकडून आरोप केले जातात. मात्र, त्यांना पैसे देण्याचे मूळ पाप काँग्रेसने केले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतक ऱ्यांच्या समस्या तसेच इतर प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. उपेक्षित वर्गाकडे सरकारचे लक्ष असल्याचे सांगून बापट म्हणाले,की मुद्रा योजनेचा जनतेला भरपूर लाभ झाला असून या योजनेअंतर्गत ८४० कोटी रूपये वाटण्यात आले आहेत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता भाजपला जनतेला कौल मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच गतीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी खासदार साबळे, आमदार जगताप, महापौर काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक केशव घोळवे यांची भाषणे झाली.

लांबलेली भाषणे अन् वैतागलेले नागरिक

दिव्यांग शिबिरासाठी मोठय़ा संख्येने दिव्यांग नागरिक आले होते, त्यांची बसण्याची व्यवस्था योग्यप्रकारे करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते उन्हातच तिष्ठत उभे होते. कार्यक्रमासाठी सकाळी नऊची वेळ होती, तो बराच उशिराने सुरू झाला. पाहुणेही उशिरा आले. कार्यक्रमात भाषणे लांबली. मंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर प्रातिनिधिक व्यक्तींना साहित्याचे वाटप करण्यात आले व सर्व मान्यवर निघून गेले. या सर्व प्रकाराने नागरिक वैतागले होते.