देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

“काही लोकांचा काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत, त्यांना कोण कशासाठी पैसे देईल? १०० कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत, जे यांना देतील. त्यांना घोटाळे करण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असे मोठे आकडे येतात. ग्रामपंचायतमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळं काहीतरी विधान करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे, बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा खोट्या पद्धतीने बाऊ केला जातोय. त्यामुळं जास्त गंभीर्याने घेण्याची गरज नाही.” असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

पिंपरी-चिंचवड शहरात हेळवे समाजाच्या मेळाव्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला होता.

सरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मानात भीती निर्माण करण्याचं काम करत आहेत –
जालना येथे आज स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसींनी काढलेल्या महामोर्चाबद्दल बोलताना पडळकर म्हणाले, “ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. या राज्य सरकरमधील काही मंत्री आणि राज्यसरकार ओबीसी बाबत गंभीर नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची भावना आहे. पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि लागणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा महाराष्ट्रात केला, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलेले आहे. तरीसुद्धा काहीजण म्हणतात आम्हाला ओबीसीत जायचं आहे, अशा पद्धतीची वक्तव्यं केली जात असल्यामुळे ओबीसींच्या मनात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राज्य सरकारची जबाबदारी आहे, ओबीसीच्या मनात ज्या शंका निर्माण झाल्या आहेत त्यांचे वेळेत निराकरण झाले पाहिजे. राज्य सरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मानात भीती निर्माण करण्याचं काम करत आहेत, ते चुकीचं आहे. ओबीसींनी देखील घाबरायचं कारण नाही, तुमच्या आरक्षणाला धक्का लावायचा संबंध नाही.”

राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर? भाजपा नेत्याने दिलं खोचक उत्तर

या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच कोणी ऐकत नाही –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत, आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर बोलताना पडळकर म्हणाले, “हा प्रकार म्हणजे त्या फायलीचा विनयभंग केल्यासारख झालं आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच कोणी ऐकत नाही. त्यांचं वजन राहिलेलं नाही. त्यांचा दबावात कोणतेही अधिकारी नाहीत. त्यांना माहीत आहे यांना प्रशासनामधील अनुभव नाही. मुख्यमंत्री आमच्या विरोधात असले तरी ही बाब गंभीर आहे. ज्याने कोणी भानगडी केल्यात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उद्या कोणीही फायलींवर खाडाखोड करेल, मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलेल. त्यांचा वचक सरकारमध्ये राहिलेला नाही, हे वेळोवेळी दिसून येतं. त्यामुळे यावर एकदा मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा.”

विरोधी पक्षात आहोत याचा आम्हाला काही फरक नाही –
“आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, याचा आम्हाला काही फरक नाही. आम्ही जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडत आहोत, त्यांच्या मानगुटीवर बसून राज्याचे विरोधी पक्षनेते काम करून घेत आहेत. करोना, चक्रीवादळ, विदर्भातील महापूर, अतिवृष्टी या सगळ्या विषयांमध्ये विरोधी पक्षाचं लोकांमध्ये गेला. लोकांमध्ये जाणे त्यांना विश्वास देणे, त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र ते उशीरा गेले, विरोधी पक्ष पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर गेला. आम्ही लोकांच्या बाजुने काम करतो आहोत.” असं म्हणत यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.

तर, “मराठा आरक्षणामध्ये राज्यसरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जो पाठपुरावा करायला हवा होता, तो केला गेलेला नाही. हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यांच्याच वकिलाने सांगितलं की, सरकार माहिती देत नाही. त्यामुळं त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा केला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यसरकार बैठकच घेत नाही.” असं देखील यावेळी पडळकरांनी बोलून दाखवलं.