भारतीय जनता पक्षात कोणत्याही परिस्थितीत घराणेशाही आणू नका, अशी जोरदार मागणी करत शिवाजीनगर मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे. शिवाजीनगरचे आमदार विनायक निम्हण यांच्या भाजप प्रवेशाविरुद्ध केलेली लढाई कार्यकर्त्यांनी जिंकली असून घराणेशाहीच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.
खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे यांना शिवाजीनगरमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीला पक्षातून मोठा विरोध असून त्याचे पडसाद या मेळाव्यात उमटले. माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेवक दत्ता खाडे, माजी शहराध्यक्ष विजय काळे, प्रा. विकास मठकरी, तसेच माजी नगरसेवक श्याम सातपुते, सुरेश नाशिककर, ज्योत्स्ना सरदेशपांडे, तसेच गजानन मेहेंदळे, विनीत कुबेर, मिलिंद एकबोटे, अ‍ॅड. विनायक अभ्यंकर, जनाभाऊ पेडणेकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
भाजपमध्ये घराणेशाहीला स्थान नाही आणि यापुढेही ते दिले जाऊ नये. घराणेशाहीच्या रोगाची लागण भाजपला होऊ नये यासाठी सर्वानी विरोध करणे आवश्यक आहे. घराणेशाही येऊ नये यासाठी खासदार शिरोळे यांनी मुलासाठी उमेदवारी घेऊ नये. तसेच भाजपची जी सुकाणू समिती आहे या समितीमधील कोणीही आपल्या कुटुंबात कोणाला उमेदवारी देऊ नये. असे प्रकार पक्षात सुरू झाल्यास सर्वच जण या पद्धतीने उमेदवारी मागतील, असे या वेळी रावत यांनी सांगितले.