प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची सोडत काढण्याच्या कार्यक्रमावरून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय नाटय़ कमालीचे रंगले. राजशिष्टाचाराचे पालन झाले नसल्याचे कारण देत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोडतीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला. त्यामुळे अर्जदार नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. भाजप नेत्यांना मागच्या दाराने काढता पाय घ्यावा लागला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप करत महापौर माई ढोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. अजित पवार ‘हाय-हाय’च्या घोषणा देत भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालय परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादीने प्रत्युत्तरादाखल भाजपला सत्तेची मस्ती आल्याची टीका केली.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठीच्या सदनिकांची सोडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यात येणार होती. पत्रिकेत उपमुख्यमंत्र्यांचे नाव प्रमुख अतिथी म्हणून होते. मात्र, पवार यांच्याच हस्ते सोडतीचा कार्यक्रम घ्या, यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह होता. यावरून बरेच दिवस धूसफूस होती, त्याचेच पर्यावसन सोमवारी प्रचंड वादंगात झाले. दिवसभराची राजकीय उलथापालथ आणि पडद्यामागील अनेक घडामोडींमुळे सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली. घराचे स्वप्न उराशी बाळगून दोन हजार नागरिक जमले होते. मात्र, दोन्ही पक्षांच्या वादात आपल्याला घरे मिळणार नाहीत, असे लक्षात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. नाटय़गृहात तसेच प्रवेशद्वारासमोर गोंधळ सुरू झाला. जमावापुढे पालिकेची सुरक्षायंत्रणा तोकडी पडली. पोलिसांची कुमक मागवावी लागली. एकूणच तापलेले वातावरण पाहून पालिका पदाधिकाऱ्यांनी नाटय़गृहाच्या मागच्या दारातून काढता पाय घेतला. नाटय़गृहासमोर गोंधळ वाढल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला.
दरम्यान, नाटय़गृहातून बाहेर पडलेल्या भाजप नगरसेवकांनी मुख्यालयात येऊन आयुक्त दालनासमोर गोंधळ सुरू केला. अजितदादांच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून आयुक्तांवर बेछूट आरोप करण्यात आले. भाजप नगरसेवकांकडून अजित पवार तसेच आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या.

राष्ट्रवादीला श्रेय लाटायचे होते. त्यामुळे प्रशासनाला वेठीस धरून सोडत अचानक रद्द करण्याची खेळी करण्यात आली. पालिकेत सत्ता असून भाजपच्या नगरसेवकांना आंदोलन करावे लागले, ही बाब दुर्दैवी आहे. दबावाला बळी पडणाऱ्या पालिका आयुक्तांचा तसेच प्रशासनाचा निषेध करते.  – माई ढोरे, महापौर

भाजपला श्रेय मिळेल, याच कारणामुळे अजित पवारांनी आजचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव आणला. मंत्रालयातून सचिवांचेही दूरध्वनी येत होते. आयुक्तांना दिवसभरात कोणाचे दूरध्वनी आले, याची तपासणी केली पाहिजे.  – एकनाथ पवार, आंदोलक नगरसेवक, भाजप

भाजपला सत्तेची मस्ती आहे. पालिका निवडणुकीत श्रेय घ्यायचे होते. म्हणून त्यांनी घाईने कार्यक्रम घेतला. पुण्यात महापौरांच्या प्रयत्नांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच कार्यक्रमात सहभागी झाले. पुण्यात जे होऊ शकते, ते पिंपरीत का होऊ शकत नाही. चंद्रकांत पाटील यांचा शहराशी काय संबंध आहे.   – राजू मिसाळ, गटनेता, राष्ट्रवादी

तांत्रिक कारणास्तव सोडत रद्द करावी लागली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. त्या सर्वाची मी माफी मागतो. राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली होती. आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता. सर्व खबरदारी घेऊन सोडतीचे पुन्हा नियोजन केले जाईल.   – श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी पालिका