firasta-blog_ambar-karve-670x200नाव – विजय कांबळे – आई धुण्याभांड्याची कामे करायची आणि वडिलांचा भंगार गोळा करायचा व्यवसाय होता. घरी मोठ्या तीन बहिणी. घरची आर्थिक परिस्थिती तुमच्या लक्षात आलीच असेल. लहानपणीच इतर मुलांपेक्षा ‘विशेष’ म्हणजेच ‘गतिमंद’ असल्याचे समजले. ज्याला धड स्वतःचे आवरणेही समजत नसायचे, त्याचे आता करायचे काय असा प्रश्न घरच्यांच्यापुढे होता. तो स्वतःच्या हातानी जेवायला लागला तरी त्यांच्यासाठी खूप होते. त्याच्या आईला कोणाकडूनतरी एनडीएमध्ये ह्या मुलांसाठी वेगळी शाळा असल्याचे समजले. तिने चौकशी करून ह्याचे नाव या ‘आशा स्कूल’मध्ये दाखल केले. इथेच त्याला ‘बाई’ भेटल्या. १-२ वर्षे शाळेचा अभ्यासक्रम शिकण्यात गेली. बहिणींची लग्न झाली, त्याचवेळी दुर्धर रोगाने विजयचे आईवडील काहीच महिन्याच्या अंतराने जग आणि त्याला सोडून गेले. त्याची अवस्था अजूनही काहीच समजायची नव्हती. विद्यार्थ्यांना आणण्यानेण्याची सोय तर पालकांनीच करायची होती. यालातर घरी सांभाळणारेही कोणी नाही. शाळेचा विचार कोण करणार?
या परिस्थितीत ‘बाई’ त्याला स्वतःच्या घरीच राहायलाच घेवून गेल्या. विजय त्यांच्याच मुलांच्या सोबत वाढला. बाई रोज सकाळी त्याचे आवरून मुलांच्याबरोबर डबा तयार करून त्याला पीएमटी बसमधून शाळेत न्यायच्या, शिकवायच्या आणि परत घरी आणायच्या. त्यावेळी शाळेत, घरी समोर जे काही दिसेल त्यावर तो हातांनी काहीतरी वाजवायचा प्रयत्न करतो, हे बाईंच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम कर्णबधिर मुलांच्या शाळेतले संगीत शिक्षक अतुल पुरंदरे यांना विनंती करून विजयला तबला शिकवायला लावले. त्यांच्याही दृष्टीने विजयला शिकवणे अवघडच होते, कारण त्यांना फक्त कर्णबधिर मुलांना शिकवायची सवय होती. पण बाईंच्या आग्रहाला मान देवून त्यांनी विजयला तबला शिकवला. कधीतरी त्याला त्याच्यातल्या सुप्त गुणांची जाणीव झाली. मग त्याला अजून पुढचे शिक्षण दिले श्री. भावे यांनी. भावेंनी विजयला तबल्यामध्ये खऱ्या अर्थाने घडवला. ‘बाई’ त्याला सगळीकडे नेण्या-आणण्याचे काम करतच होत्या. बाईंनी आग्रह धरून त्याला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसवले. आणि एक दिवस हा विजय तबल्यामध्ये ‘अलंकार’ची परीक्षा ‘सर्वसाधारण मुलांबरोबर’ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. आज जन्मतः ‘गतिमंदत्वाचा’ शाप घेऊन जन्माला आलेला मुलगा पुण्याजवळच्या दोन शाळेत एकटा जाऊन शाळेतल्या मुलांना तबला शिकवतो आणि स्वकमाईवर आपला खर्च भागवतो. आईवडील आठवणीत असण्याची त्याची समज नव्हती, पण बाईंनी त्याला आईच्याच मायेने जवळ केलेलं तो विसरला नाही. विजयने त्याच्या पहिल्या पगारातून ‘बाईंच्या’साठी एक चांगली साडी घेतली. बाईंचे यजमान त्यावेळी दीनानाथ रुग्णालयात रुग्णशय्येवर आहेत, हे समजल्यावर या मुलाने तिकडे जाऊन मूकपणे नमस्कार करून त्यांच्या हातात साडी ठेवली. बाईंचे डोळे भरून येणं स्वाभाविकच होतं. त्यांनी विजयच्या लग्नात ‘तीच’ साडी नेसून येण्याचे आश्वासन दिलं.
नाव कल्पेश्वरी रावत, घरची परिस्थिती बेताचीच. ‘गतिमंद’ असल्याचा शिक्का बसल्यामुळे घरचे सोडून कोणी लक्ष द्यायचे नाही. आशा स्कूलला प्रवेश घेतला, पण नेहमीचा अभ्यास काही जमत नव्हता. पण हातवाऱ्यांवरून तिला काय करता येईल याचा अंदाज ‘बाईंना’ आला. त्यांनी तिला आधी खेळण्याची माती आणून दिली आणि ती भातुकलीच्या पोळपाटावर लाटायला शिकवली. नंतर घरून कणिक आणून त्याच्यावर पोळ्या लाटायला शिकवल्या. मग त्या तडक गेल्या महिला गृहउद्योगच्या लिज्जत पापड कारखान्यात. त्या लोकांशी बोलून पापडाची कणिक घेतली. आधी ‘बाईंनी’ स्वतः लिज्जतनी सांगितलेल्या कणकेच्या प्रमाणात आणि त्यांना हव्या तशा दर्जाचे पापड लाटायला शिकल्या. मगच ते काम कल्पेश्वरीला शिकवले. फक्त काहीच दिवस लागले तिला शिकायला. विसाव्या दिवशी कल्पेश्वरीने लिज्जतकडून पापड केल्याची पहिली कमाई मिळवली. असेच काम करताना बाईंनी तिच्यासाठी शिवणे गावातील एका कारखान्यात काम बघितले. आज ती त्या कारखान्यात संपूर्णवेळ काम करते. स्वखर्च भागवते.
अभिजित वायदंडे हा अजून एक गतिमंदत्वाचा शाप घेऊन जगात आलेला मुलगा. याची आवड जगावेगळीच म्हणायला पाहिजे ती म्हणजे स्वच्छतेची. याला शौचालय साफ करणे आवडत असे. त्याला कितीही समजावून इतर कामात गुंतवले तरी तो परत तिकडे जावून ते साफ करत बसे. पण साफ करायचा ते एकदम लख्ख. ’बाई’ थेट एनडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्या, त्यांच्या परवानगीने त्याला साफसफाईचे तात्पुरते काम मिळवले. मग आडव्या आलेल्या एडीएच्या लेबर कंत्राटदाराशी त्या भांडल्या. पण त्याचा परिणाम म्हणून आता हा मुलगा एनडीएममधे सफाई कर्मचारी म्हणून आनंदाने काम करतो. असाच अशोक मांढरे किराणा मालाच्या दुकानात काम करतो. तर बाळासाहेब धोंडगे हा सिलेंडर विक्रेत्याकडे अंगमेहनतीचे काम करतो. संदीप पवार हा असाच मुलगा, त्याचे कौशल्य बघून बाईंनी त्याला जवळच्याच एका कारखान्यात कामाला लावले. पोरं मार्गी लागली.
स्वप्ना साळवी या मुलीचे उदाहरण तर बघण्यासारखेच आहे. तिचा ‘IQ’ गट हा ५५-६९ चा म्हणजे अवस्थावरील मुलांच्यापेक्षा थोडी बरी. शाळेत तिची कुवत बघून ‘बाईंनी’ तिला वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवायचे काम शिकवले. ब्राह्मण महासंघाचे श्री. दाते यांनी तिच्यासाठी सायकल आणि इतर मदत दिली. एनडीएच्या लोकांनी पुन्हा सहकार्य केले आणि तिथल्या गोल मार्केट मध्ये तिने बनवलेल्या पिशव्या विकत घ्यायला सुरुवात केली. मोठी झाल्यावर ‘बाईंनी’ तिच्या शेजारच्या मावशींच्या सोबतीने श्री. करंदीकर यांच्या कारखान्यात तिला कामाला लावले. आता ही मुलगी स्वतःचा सगळा खर्च स्वतः भागवते, पण म्हणून या मुलीची जाणीव तिथे संपली नाही. आता ती कारखान्याच्या सुटीच्या दिवशी, गुरुवारी ‘आशा स्कूल’मध्ये जाते, तिथल्या लहान मुलांना तिची ‘स्पेशालिटी’ असलेल्या कागदी पिशव्या बनवायला शिकवते. त्या मुलांनी बनवलेल्या पिशव्या एनडीएच्या गोल मार्केट परिसरात विकल्या जातात. आज सगळ्या प्रवासाचे आणि देण्याच्या सवयींचे श्रेय स्वप्ना केवळ तिच्या ‘बाईंना’ देते.
या सगळ्या व्यक्तींच्यात काही साम्य आहेत. पहिले अर्थातच, ही सगळी अतिशय सामान्य आर्थिक परिस्थितीत जन्मतःच ‘गतिमंदत्वाचा’ शाप असलेली मुले आहेत. दुसरे यापैकी कोणाहीकडून जगातल्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्या कर्तृत्वाची अपेक्षा धरली नव्हती. उलट ही मुले आयुष्यात कधीही काही करू शकणार नाहीत अशीच सगळ्यांची धारणा होती. तिसरे साम्य म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचा ध्यास घेतलेली व्यक्ती एकच आहे ती म्हणजे श्रीमती संजीवनी चंद्रशेखर फडके.
त्यांचे वडील मधुकर केळकर हे भारतरत्न महर्षी कर्वे यांचे जवळचे सहकारी, ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे ‘इंटरनल ऑडिटर’ म्हणून काम करायचे. संस्थेच्या आवारातच राहात असल्याने काकूंची जडणघडण संस्थेचे आणि वडिलांचे सेवाभावी काम बघतच झाली. बहुतेक त्यांचा स्वभाव आणि भविष्यातली गरज ओळखूनच महर्षी कर्वे यांची नात असलेल्या कुंदाताई नेने ह्यांनी त्यांना DTMR (Diploma in Teacher for Mentally Retarded) हा कोर्स करायला सांगितले. या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांची आणि संस्थांची उणीव त्यावेळीही होतीच. त्यामुळे कोर्स पूर्ण झाल्यावर त्या लगेचच एका नामवंत खासगी संस्थेत शिकवायला लागल्या. पण तिथल्या गैरप्रकाराला विरोध करत लवकरच त्यांनी त्या नोकरीला रामराम ठोकला. त्याच सुमारास एनडीएमध्ये सैनिकांच्या आणि आसपासच्या भागात राहाणाऱ्या लोकांच्या ‘गतिमंद’ आणि ‘कर्णबधिर’ मुलांच्यासाठी ‘सुहृद मंडळानी’ ‘आशा स्कूल’ सुरू केली होती. शाळेची जागा एनडीएच्या आवारात, आवश्यक वस्तूंची मदत एनडीए म्हणजेच भारतीय सैन्य करणार, व्यवस्थापन ‘सुहृद मंडळ’ बघणार आणि तिथे काम करणाऱ्या लोकांचे पगार, भत्ते महाराष्ट्र शासन करणार, असा तो संयुक्त प्रकल्प सुरू असतो. काकू तिथे शिकवायला गेल्या, त्या दिवशीपासूनच ‘आशा स्कूल’ त्यांच्या आयुष्याचे ध्येय झालं.
शाळेचे काम आणि स्वरूप समजावून घेण्यात काही महिने गेले. ‘IQ 0’ ते ‘IQ ६९’ पर्यंत असलेली मुले इथे शिकायला येतात. त्याबरोबरच काही ‘ऑटिस्टिक’ म्हणजेच स्वमग्न मुलेही असतात. त्यावेळी त्यांना सरसकट पाठ्यपुस्तकांचे शिक्षण देऊन आणि त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी शाळेतून मोकळे केले जायचे. अभ्यासक्रम सामान्य मुलांच्या अभ्यासक्रमासारखा होता. पण ज्या मुलांना निसर्गाने बुद्धिमत्तेसह अनेक गोष्टीत वंचित ठेवले आहे, ती मुले हे कसे शिकणार? या कारणाने कित्येक मुलांना शाळा सोडायलाही लागायची, त्यांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या मनःस्थितीवर याचा अतिशय विपरीत परिणाम होत असे. ‘विशेष मुलांच्या’ अभ्यासक्रमातल्या या त्रुटी काकूंच्या लक्षात आल्या.
सैन्य अधिकारी आणि जवानांची मुले सोडली तर येणारी बाकी मुले ही त्यावेळी आसपासच्या ग्रामीण किंवा झोपडपट्टीसारख्या भागातून येत असत. त्यात बहुतेक मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. त्यांचा जीव आधीच मुलांच्यावर होणारा खर्च बघून मेटाकुटीला आलेला असायचा.
मग काकूंनी स्वतःचे काही निर्णय घेतले. आधी त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचे गरज लक्षात घेतली. त्यासाठी पहिली गरज होती मुलांना स्वावलंबी करायची. त्यातून जी मुले ‘टॉयलेट सेन्स’ शिकतील त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचं व्रत त्यांनी हातात घेतले. बालकामगार कायद्याचा अभ्यास करून त्यांनी १४ वर्षाच्या वरील मुलांना त्यांचा कल ओळखून पावले उचलली आणि व्यवस्थापनाला विश्वासात घेतले. जी मुले त्या श्रेणीत बसतील त्यांच्या घरच्यांशी बोलून, त्यांच्या येण्याजाण्याची सोय केली. त्यासाठी त्यांना विजय आणि त्याच्यासारख्या मुलामुलींना घेऊन पीएमटीमधून रोज येजा करायला लागायची. त्यावेळी बसची कमी असलेली संख्या लक्षात घेतली तर या प्रश्नाचा अंदाज येऊ शकेल. तरी या मुलांची शारीरिक, मानसिक अवस्था बघूनही काही ड्रायव्हर, कंडक्टर लोकांनी दिलेले चांगलेवाईट अनुभव त्यांनी घेतले. पण यातून त्यांना स्वतःचा मुलगा ‘गतिमंद’ असलेले शेख काका हे रिक्षावाले काका भेटले, त्यांच्यासारख्या विश्वासू माणसामुळे मुलींच्या येण्याजाण्याचा प्रश्न सुटला. अनेक प्रश्न उभे रहात होते, काकू त्यातून मार्ग काढत होत्या. लहानमोठे प्रश्न सोडवण्यात बराच काळ गेला. आपला अनुभव, स्वतःच्या ओळखी पणाला लावत काकू शक्य होईल तेवढ्या मुलांची काळजी घेतच राहिल्या. नोकरी करायला लागल्या तेव्हा शिक्षिका असलेल्या काकू आता सुहृद मंडळाच्या एनडीए युनिटच्या प्रमुख म्हणून काम बघतात. अनेक मुले त्यांच्या हाताखालून बाहेर पडून आज जगात स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. घरच्या जवाबदाऱ्या त्यांनाही चुकल्या नाहीतच. अनेक वर्षे अंथरुणावर असलेल्या नवऱ्याच्या आधाराशिवाय स्वतःच्या बहिणींच्या सोबत आपल्या वडिलधाऱ्यांची जवाबदारीही त्यांच्यावर आहेच. ती समर्थपणे पेलत, एकीकडे शिक्षिकेचे आयुष्य सेवाभावी वृत्तीने जगतायत.
एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर, घरी वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्तीकरता अर्ज केला. हे समजल्यावर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना निवृत्ती मागे घ्यायला लावली आणि एकवेळ आशा स्कूल सोडा.तुमचे सगळे कुटुंब घेऊन एनडीए मधेच राहायला या पण आमच्या मुलांना आणि एनडीएला  सोडून जाऊ नका. येवढे प्रेम कोणाच्या नशिबात असते? अजूनही विजय जेव्हा स्वतः मोबाईलवर फोन करून त्यांच्या हातचा ‘आमटीभात’ खायला येतोय म्हणतो, तेव्हा तो त्याला वाढणे, हेही त्या त्याची गुरुदक्षिणा मिळाल्यासारखेच मानतात.
phadke-kaku-2शाळेतल्या मुलांची ‘बाई’पेक्षाही ‘आई’ होताना फडके काकूंनी स्वतःच्या मुलीला आणि मुलाला तेवढ्याच समर्थपणे वाढवले. दोघांचीही आता लग्न झाली. डॉक्टर असलेली त्यांची सून पुण्याजवळच्या गावात जाऊन आपली सेवा देते. काकूंच्या संस्कारामुळेच त्यांचा मुलगा चैतन्य आज ‘पर्यायी उर्जा’ या क्षेत्रात काम करतो. भारतभर अनेक खेडी स्वप्रकाशित करायचे मोठे काम त्याने केलंय, करतोय. एका प्रकारे लोकांची घरे उजळवण्याचे कामच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचले आहे.
एवढे काम करूनही फडके काकूंना स्वस्थता नाहीये. त्यांना विशेषतः ‘त्यांच्या मुलींची’ आणि त्यांच्या पालकांच्या चरितार्थाची काळजी आहे. आजच्या काळात या ‘विशेष मुलींना’ सुरक्षित वातावरणात काम करता यावे, त्यांच्या संसाराला हातभार लागावा ही त्यांच्या दृष्टीने मुख्य गरज आहे. प्रयोग म्हणून त्यांनी या दिवाळीत या मुलींच्याकडून स्वतःच्या घरातच, स्वतःच्या देखरेखीखाली फराळाचे पदार्थ बनवून घेऊन विकले. मित्रमंडळीनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तो बघून आता फडके काकूंनी मुलींकडून रोज नाश्ता, पोळीभाजी बनवून घेण्याचा प्रयत्न करायच ठरवलंय. त्याला लागणारी ‘किचन’ची जागा, इतर साहित्य जमा करण्याचे काम सुरु करायचे आहे. आता गरज आहे ती दानशूर व्यक्तींनी आपणहून पुढे येवून मदत करायची. फडके काकूंसारख्या मनात प्रचंड संवेदना घेवून जगणाऱ्या व्यक्तीला या कामात मदत करण्याची. दीपमाळ त्यांनी उभी केलीच आहे, गरज आहे दीपमाळेवर एकेक दिवा लावणाऱ्यांची.
संपर्क –
चैतन्य फडके
A/c No.20184118402
State Bank Of india,Karve Nagar Branch,
Ifsc Code- SBIN0013530
– अंबर कर्वे