05 July 2020

News Flash

BLOG : गुगलचा पुणेरी चकवा!

पुण्यात गाडी चालवायला शिकलात की, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गाडी चालवू शकता, अशी एक म्हण आहे.

| August 25, 2015 10:42 am

पुण्यात गाडी चालवायला शिकलात की, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गाडी चालवू शकता, अशी एक म्हण आहे. आज तीच गोष्टं गुगल मॅपच्या बाबतीतही लागू ठरते. जर तुम्ही पुण्यात गुगल मॅप्सचा वापर करून हव्या त्या जागी पोहोचलात तर गुगल मॅप्सच्या सहाय्याने तुम्ही जगात कुठेही प्रवास करू शकता, असे मी स्वानुभवाने सांगू शकतो.
मोबाइल-इंटरनेट क्रांतीमुळे माणसाला पंगुत्व आले आहे. हल्ली अगदी जवळच्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचे मोबाइल क्रमांक आपल्याला आठवत नाहीत कारण ते मोबाइलमध्ये स्टोर केलेले असतात. तीच गोष्टं पत्त्यांची. गुगल मॅप्समुळे हल्ली माणूस तिऱ्हाईत देशातही आत्मविश्वासाने प्रवास करू शकतो. पण ती गोष्टं पुण्याबाबत लागू पडत नाही, असं मी आता स्वानुभवातून म्हणू शकतो. तसं माझ्या आजीचे माहेर पुण्याचे. तिनेच बांधलेले आमचे एक घर आहे पण ते भाड्याने दिले असल्याने तिथे अनेक वर्षांत जाणे येणे होत नाही. बरेच नातेवाईक आणि आता तर मुंबईतील अनेक मित्रंही कामानिमित्त पुणेकर झाले आहेत. पुण्याशी असलेले माझे नाते एवढे स्पष्ट करणारी एवढी लांबवर प्रस्तावना लिहायचे कारण की, पुणेकरांचा अपमान करायचा या लेखाचा उद्देश नाही. पण पुण्यातले लोकं जरा अधिकच स्मार्ट असतात. माहीत नसूनही छातीठोकपणे एखादा पत्ता सांगण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन पत्ता विचारणारा माणूस मग त्या भागातील गल्ली-बोळं फिरत रहातो. यामुळे पुण्यात गुगल मॅपचा अधिकच आधार वाटतो. गाडीतील जीपीएसपेक्षा तो अधिक खात्रीशीर असतो कारण त्यात वाहतूक कोंडीची माहिती जरा अधिक स्पष्टपणे समजते.
kirloskar_mapsपण काल एका परदेशी जलतज्ज्ञाबरोबर पुण्यात काही महत्त्वाच्या बैठकांसाठी आलो असता एकाच दिवसात गुगलने आम्हाला तीन वेळा चकवले. सकाळची पहिली बैठक बाणेरला किर्लोस्कर ब्रदर्सच्या मुख्यालयात होती. आमचा चालक मुंबईचा आणि त्यातून नेपाळी असल्यामुळे मी त्याच्यापेक्षा गुगलवर अधिक विश्वास ठेऊन नेव्हिगेशनला प्रारंभ केला. सेनापती बापट मार्गावरून – बाणेर म्हाळुंगे मार्गाने आम्ही मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पोहोचलो. डोळ्यांसमोर किर्लोस्कर आणि सरळ दिशा असलेला बाण होता. पण कच्चा रस्ता असल्यामुळे आम्ही गुगलवर विश्वास ठेवला. गुगलनुसार हा रस्ता हायवेवरून सरळ जाऊन मर्सिडिझ बेंझ शोरूमला वळसा घालून जात होता. तो रस्ताही कच्चा आणि खड्ड्यांनी भरलेला होता. त्यावरून पुढे गेलो तर किर्लोस्कर कंपनी लागली खरी पण आम्ही कंपनीच्या पाठच्या दारात पोहोचलो. तेथील सुरक्षा रक्षक काही आत सोडेनात. आम्ही विचारले की, मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे तर तो म्हणाला की, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा हायवेवर जाऊन वळसा घालून यावे लागेल. बैठकीची वेळ झाली असल्यामुळे त्याच्या विनवण्या केल्या आणि कसाबसा आत प्रवेश मिळवला.
finolex_mapsदुपारी चिंचवड रेल्वे स्टेशन मार्गावर फिनोलेक्स पाइप्समध्ये बैठक होती. गुगल मॅपमध्ये २८ मिनिटं वेळ दाखवली असल्यामुळे आम्ही अर्धा तासात पोहोचत आहोत असे कळवले. यापूर्वी मी फिनोलेक्समध्ये तीन वेळा येऊन गेलो असल्यामुळे आता काही फारशी अडचण येणार नाही, असे वाटले आणि मी गाफिल राहिलो. ड्रायव्हरने फिनोलेक्स पाइप्स असा पत्ता गुगल मॅप्समध्ये टाकला. पण गुगलने फिनोलेक्स पाइप (एम.आय.डी.सी., चिंचवड) ऐवजी फिनोलेक्स केबल्सचा (पिंपरी) पत्ता दाखवला पण त्यावर नाव मात्र फिनोलेक्स पाइप असे होते. आदित्य बिर्ला हॉस्पिटलनंतर गाडी उजवीकडे वळली तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल जागी झाली पण गुगल मॅपनुसार आम्ही योग्य रस्त्याने चाललो होतो. खात्री करण्यासाठी मी फिनोलेक्स ऐवजी जवळच्या डबल ट्री हिल्टन हॉटेलचा सर्च दिला आणि लक्षात आले की, आम्ही चिंचवड ऐवजी पिंपरीकडे चाललो होतो. चूक लक्षात आली तेव्हा आम्ही पिंपरी बाजाराच्या मध्यभागी असल्याचे लक्षात आले. तिकडून आमचा पत्ता १५ मिनिटांवर असल्याचे कळल्यावर आम्ही पुन्हा एकदा गुगलवरच विंसबून पुढे निघालो. गुगल मॅपमध्ये जो रस्ता १५ मिनिटांचा होता, तो प्रत्यक्षात पिंपरीच्या भाजी मार्केटमधून जात होता. आम्ही त्यात अडकलो. ना धड पुढे जाता येईना… ना गाडी उलटी वळवता येईना. भाजीवाल्यांना विचारले असता त्यांनी डावीकडे घ्या, मग सरळ जा… उजवीकडे घ्या असे सांगितले खरे पण तसे करताना आम्हाला अनेक टॉमेटो आणि वांगी चिरडत गाडी पुढे काढावी लागली. एका चिंचोळ्या गल्लीतील घरासमोर लावलेली शिडीही आमच्या गाडीच्या धक्याने खाली पडली आणि त्यावरून कौलांवर चढलेला माणूस तिथेच राहिला. खरोखरच एखाद्या हिंदी चित्रपटासारखा अनुभव होता. मिटिंगसाठी फिनोलेक्सचे महत्त्वाचे अधिकारी ताटकळत राहिल्याने त्यांचे फोनवर फोन येत होते… पण आम्हाला काही सांगता येईना की, आम्ही नक्की कुठे आहोत. शेवटी १०/१५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आम्ही पिंपरी-चिखली रस्त्यामार्गे ऑटो क्लस्टरला लागलो. तिकडून हिल्टन हॉटेलकडे गेलो तर एका ठिकाणी डेड एंड आला. हॉटेल डोळ्यांसमोर दिसत होते पण आम्ही आणि हॉटेल यामध्ये एक छोटी झोपडपट्टी आणि भिंत आडवी आली होती. आम्ही हिल्टन हॉटेलच्या मागच्या बाजूस आलो आहेत हे लक्षात आले आणि मग पुन्हा एकदा शोध सुरू झाला. यावेळेस रस्त्यातील माणसांनी रस्ता दाखवला आणि आम्ही ५ मिनिटांत फिनोलेक्समध्ये पोहचलो. दुपारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांबरोबर बैठक झाल्यानंतर पुण्यातील सर्किट हाउसला जाताना पुन्हा एकदा गुगलने चूक केली पण तो पत्ता काही बिल्डिंग पलिकडे असल्यामुळे त्याचा फारसा फरक पडला नाही.
संध्याकाळी ६ वाजता आमच्या पाहुण्यांचे सेनापती बापट मार्गावरील मराठा चेंबरमध्ये भाषण होते. सर्किट हाउसवर जिल्ह्याचे पालक मंत्री, पालिका आयुक्त, पुणे महानगर प्राधिकरणाचे सीइओ, कलेक्टर आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबरची बैठक ५.४० पर्यंत लांबली. त्यामुळे १० मिनिटं उशीर होणार हे गृहीत धरून आम्ही निघालो. शिवाजी नगर रेल्वे स्टेशनपासून सेनापती बापट मार्गापर्यंत रस्ता नेहमीचा असल्याने तिथपर्यंत जायला गुगलचा आधार घेतला. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने आल्यावर आंबेडकर-वेल्सली रस्त्याने पुढे जा असे गुगलने सांगितले पण प्रत्यक्षात तो रस्ता एक दिशा मार्ग असल्याने आत शिरता येईना. मग पुन्हा मुंबई-पुणे रस्त्याला लागून संचेती हॉस्पिटल जवळून गणेश खिंड रस्त्याला लागावे असा विचार केला पण त्या रस्त्याला जो ट्राफिक जाम लागला, त्याने आमची तब्बल २० मिनिटं खाल्ली. शेवटी ओरिजनल प्लॅननुसार संध्याकाळी ५.३० ला पोहचणार असलेले आम्ही तब्बल ६.४५ला पोहचलो. पुढील कार्यक्रम सुरळीत झाला. पण गेल्या ६ महिन्यात पुण्याच्या १० चकरा मारूनही आपण या शहरात किती परके आहोत या विचाराने मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.
पण त्याचबरोबर भविष्यात पुण्यात गुगल मॅप्सचा वापर करायचा का नाही हा अधिक मोठा प्रश्न पडला. शेवटी गुगल मॅप्स ही गोष्टं काही आकाशातून आली नाही. आकाशातील उपग्रह आणि जमिनीवरील लोकं यांच्याकडून सातत्याने संकलित केलेल्या माहितीचा ताळमेळ जमवून गुगल तुम्हाला अमुक एका ठिकाणी पोहचायला किती वेळ लागेल आणि किती रस्ते उपलब्ध आहेत हे सांगते. त्यातील शहरं आणि रस्त्यांची नावं उपग्रहाकडून मिळतात पण त्या रस्त्यावर कोणकोणत्या इमारती आहेत किंवा त्यांचा पत्ता / पिनकोड इ. माहिती आपल्या वापरकर्त्यांकडून गुगलला मिळत असते. देशात इतरत्र आणि परदेशातही मला गुगलने एवढे नाही चुकवले जेवढे एकट्या पुण्यात चकवले. कालचा अनुभव हा काही पुण्यात गुगल मॅपबद्दल आलेला पहिला अनुभव नव्हता. पण तो महत्त्वाचा होता कारण एकाच दिवशी सलग ३/४ वेळा गुगलने मोठी गल्लत केली. हल्लीचे युग हे लोकलायझेशनचे आहे. त्यानुसार गुगल सारख्या कंपन्या देश-काळ आणि लोकांच्या स्वभावानुसार आपल्यामधे बदल करतात. त्यामुळे झाला प्रकार हा गुगलने लोकलायझेशनमध्ये टाकलेले पुढचे पाऊल होते का चुकीचा पत्ता सांगून पाहुण्यांची थोडी मस्करी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले काही पुणेकर आता इंटरनेटवरही पोहोचले असून ते एकाच वेळेस गुगल आणि पाहुणे अशा दोघांची गंमत करत आहेत, याचा मी शोध घेत आहे.
– अनय जोगळेकर
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2015 10:42 am

Web Title: blog by anay joglekar on google maps in pune
Next Stories
1 पुण्यात स्विमिंग पूल आणि बांधकामासाठी पालिकेचे पाणी वापरण्यावर बंदी
2 ढोलाच्या दणदणाटाला बाजारी स्वरूप!
3 सासर-माहेरच्या मायेचा धागा घट्ट करणारी लुंबा राखी
Just Now!
X