शहरात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय

पुणे : बी. टी. कवडे रस्त्यावर असलेल्या तारादत्त कॉलनीतील दोन हजार चौरस फुटांचा एक बंगला जॅक लावून उचलण्यात आला आणि या बंगल्याची उंचीही वाढविण्यात आली. बिल्डिंग अपलिफ्टिंग या तंत्रज्ञानाने ही किमया साधता आहे. जॅक लावून गाडी उचलल्याप्रमाणे चक्क बंगला उचलण्यात आल्याचा विषय शहरात चर्चेचा आणि कुतूहलाचा ठरला आहे.

बी. टी. कवडे रस्त्यावरील तारादत्त कॉलनीत शिवराम भारद्वाज यांचा बंगला आहे. या परिसरात झालेली विकासकामे आणि डांबरीकरणामुळे रस्त्यांची उंची वाढली होती. त्या तुलनेत घराची उंची कमी झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी आणि चिखल थेट भारद्वाज यांच्या घरात येत असे. त्यावर कोणती उपाययोजना करता येणे शक्य आहे, याचा शोध भारद्वाज यांनी इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना बिल्डिंग अपलिफ्टिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हरियाणा येथील संबंधित कंपनीशी संपर्क साधला. गेला दीड महिना ही प्रक्रिया सुरू होती. बंगल्याच्या चारही बाजूने कंपनीकडून दोन फूट खोदाई करण्यात आली आणि बंगल्याच्या पायामध्ये अडीचशे जॅक बसविण्यात आले. त्यानंतर जॅकद्वारे बंगला वर उचलण्यात आला. चार फुटापर्यंत घर जॅकच्या मदतीने उचलण्यात आले असून पायाच्या पोकळीत सिमेंट आणि वीटा भरून बंगल्याची उंची वाढवून ती रस्त्याच्या पातळीपर्यंत आणण्यात येणार आहे.