काही वर्षांपूर्वी मंजूर केलेला व अनेकदा सर्वेक्षणही झालेल्या पुणे- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातून पुण्याला वगळण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून आता केवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी ही माहिती मिळविली असून, पुण्याला वगळण्याबाबत त्यांनी तीव्र अक्षेपही नोंदविला आहे. २००९-१० मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुणे-मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रकल्प रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर केला होता. त्यांच्यानंतर रेल्वेमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनीही याच प्रकल्पाला मंजुरी देऊन हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र सध्या या प्रकल्पातून पुण्याला वगळून केवळ मुंबई-अहमदाबाद मार्गाचा विचार करण्यात येत असून, जापनीज इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडून या मार्गाच्या सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच त्याचे काम सुरू होऊ शकणार आहे. पुणे-मुंबई-अहमदाबाद ही ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने धवणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन होणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने पुण्याला या प्रकल्पातून परस्परक वगळले, असा आरोप हर्षां शहा यांनी केला आहे.