घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास सुनील घोडके (वय वर्ष २१ रा सोनई पार्क खराडी रोड पुणे), निखिल दत्तात्रय गंगणे (वय वर्ष २३ रा मोरे वस्ती चिखली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलिसांना बहिणाबाई चौधरी सर्प उद्यानाच्या जवळ विकास घोडके हा सराईत गुन्हेगार आल्याचे पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली असता निगडी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याचा साथीदार निखिल गंगणे सोबत मिळून घरफोडीसह चारचाकी गाडी, दुचाकी लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली.

त्यांच्या वर निगडी पोलीस स्थानकात ५ गुन्हे, विमाननगर ४ गुन्हे, हडपसर २ गुन्हे चंदननगर २ गुन्हे, लोनिकंद २ गुन्हे असे एकूण १४ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून ३० तोळे सोने, चांदीचे दागिने, ४ लॅपटॉप, ३ एलईडी टीव्ही, साउंड सिस्टम, कॅमेरा, फास्ट ट्रक घड्याळ, एक मोटार, एक दुचाकी तसेच घरफोडीचे साहित्य असे एकूण ११ लाख ५१ हजार रु किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच आणखी एका गुन्ह्यात एक अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १ लाख रु किमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.