राज्याचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. घरची हालाखीची परिस्थिती असताना पुण्यात नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेत काजल रमेश शिवशरण या विद्यार्थीनीने ४८ टक्के गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे धुणीभांडी करणाऱ्या आईला हातभार लावताना हॉटेलमध्ये काम करीत तीनं हे यश मिळवलं आहे. पुढे वाणिज्य शाखेतून उच्च शिक्षण घ्यायचं असून मोठं होऊन पोलीस अधिकारी व्हायचं तिचा मानस आहे.

आपल्या या यशाबद्दल आणि परिस्थितीवर भाष्य करताना काजल सांगते, “मी लहान असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मला आणि भावाला घेऊन आई पुण्यात मामाकडे राहण्यास आली. पुण्यात आल्यावर एका शाळेत प्रवेश घेतला होता. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती असल्याने माझं शिक्षण ८ वी पर्यंतच झालं. पुढील शिक्षण करणं शक्य नव्हतं.

दरम्यान, आई आसपासच्या घरांमध्ये धुणीभांडी करायची. आईसोबत मी देखील जात होते. त्याचदरम्यान एका हॉटेलमध्ये मी कामाला जाऊ लागले. तिथल्या मालकीण बाईंनी माझी चौकशी केली आणि मला शिक्षण पुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले आणि सर्वतोपरी मदत केली. त्यानंतर मी सरस्वती नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यासला पुन्हा सुरुवात झाली. दिवसभर काम आणि त्यानंतर शाळेत यायचे, खूप थकवा यायच पण आपल्याला पुन्हा शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे, ती संधी जाऊ द्यायची नाही, अशी इच्छा मनी बाळगत दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. आता पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.