‘केंद्रात राज्यमंत्रिपदही चालेल. मात्र, केंद्रात एक आणि राज्यात एक असेच मंत्रिपद हवे. मला आंबेडकरी चळवळ देशपातळीवर न्यायची आहे. त्यामुळे मी केंद्रातच राहणार,’ असे खासदार रामदास आठवले यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्रिपदासाठी कुटुंबीयांची नावे सुचवली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप बरोबरील घटक पक्षांच्या मंत्रिपदावरून सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘केंद्रात मंत्रिपद हवेच,’ या मागणीचा पुनरुच्चार करून आठवले म्हणाले, ‘रिपब्लिकन पक्षाची देशभरात ताकद आहे. केंद्रात आणि राज्यांत भाजपची सत्ता येण्यात आमची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एक एक मंत्रिपद मिळावे. त्याचप्रमाणे महामंडळामध्ये ५ टक्के कोटय़ाप्रमाणे स्थान मिळावे, अशी आमची मागणी आहे. केंद्रात राज्यमंत्रिपदही चालेल. मात्र केंद्रात मंत्रिपद हवेच. मी राज्याच्या राजकारणात पुन्हा यावे अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मात्र, मला आंबेडकरी चळवळ पुढे न्यायची आहे. त्यामुळे मी केंद्रातच सक्रिय राहणार.’
मंत्रिपदासाठी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांचे नाव पुढे येत असल्याच्या चर्चेबद्दल माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले, ‘आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मंत्रिपद मिळाले पाहिजे. मी माझ्या कुटुंबीयांची नावे सुचवलेली नाहीत.’ या वेळी पक्षातील इच्छुकांची नावे जाहीर करण्यास आठवले यांनी नकार दिला.