पुण्यातील दांडेकर पूल येथे आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास मुठा कालव्याच्या भिंतीला भगदाड पडून २०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून ४० घरे पाण्यात वाहून गेली आहेत. तर डोळ्यांसमोर संसार वाहून गेल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहण्यास मिळत आहे. हीच घटना जर रात्रीच्या सुमारास घडली असती आणि घरामध्ये पाणी शिरलं असतं. तर या वस्तीमधील एकही व्यक्ती वाचला नसता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेविषयी येथील रहिवासी पल्लवी फडकले म्हणाल्या, मी या वस्तीमध्ये गेल्या १२ वर्षांपासून राहत आहे. घरातच मी बिल बुक नंबरिंगचे काम करते माझा मुलगा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आज कालवा फुटल्याने घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे. माझ्या कामाच्या साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यावर माझे घर चालत आहे. आता आम्ही कस जगायचं आणि मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

जनता वस्तीतील किराणा मालाचे दुकानदार प्रभाकर मारणे म्हणाले, या वस्तीमध्ये मागील ३० वर्षांपासून किराणा मालाचे दुकान असून आज नेहमीप्रमाणे दुकानात बसलो होतो. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सर्वांची एकच धावपळ सुरू झाली आणि सगळे पाणी आलं म्हणून ओरडायला लागले. दुकानात कोणी नसल्याने मी दुकानात थांबून राहिलो. मात्र, हळूहळू पाणी वाढू लागले. वस्तीच्या बाहेर असणाऱ्या लोकांना मी आत असल्याची माहिती मिळाल्याने मला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. जर मला बाहेर काढले नसते तर मी वाचलो नसतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. जर हीच घटना रात्रीच्या वेळी घडली असती तर वस्तीमधील कोणीही वाचले नसते, अशी भावनाही यावेळी व्यक्त केली.