राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या प्रशासकीय बदल्या आता रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. आता शिक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्याचे निर्देश राज्याचे कक्ष अधिकारी सं. ना. भंडाकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

करोना संसर्गाच्या काळात शाळा सुरू झालेल्या नसल्याने ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले जात आहे. अशा काळात ग्रामविकास विभागाकडून यंदा ऑफलाइन बदल्या करण्याचे नियोजन करण्यात येत होते. बदलीसाठी पात्र असलेल्या १५ टक्के  शिक्षकांची माहिती संकलित करून १० ऑगस्टपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण  केली जाणार होती. मात्र, करोना संसर्गाच्या काळात ही प्रक्रिया राबवायची कशी असा जिल्हा प्रशासनासमोर प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बदली प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन ग्रामविकास विभागाकडून बदल्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदली प्रक्रिया रद्द करतानाच गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या करण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

बदली प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाने राज्यभरातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये यादृच्छिक फे री, विस्थापित आणि वेगवेगळ्या कारणाने बदली झालेल्या शिक्षकांना बदलीची संधी देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार आहे, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.