शहराच्या वाहतूक समस्येबाबत व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करत असलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन खास सत्कार करण्यात येणार आहे. तेंडुलकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करावा, या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी विविध उपक्रम, कार्यक्रमांद्वारे सातत्याने समाजप्रबोधनाचे काम केले. शहरातील वाहतूक समस्येवर गेल्या काही वर्षांपासून ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. वाहतूक समस्येबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन तेंडुलकर यांच्या कार्याचा गौरव करावा आणि महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र द्यावे, असा प्रस्ताव महापालिकेतील सभागृहनेता शंकर केमसे यांनी सर्वसाधारण सभेला दिला होता. मानपत्र व सत्काराच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार तेंडुलकर यांना मानपत्र देऊन महापालिकेतर्फे त्यांचा खास सत्कार करण्यात येईल.