News Flash

शिवाजी रस्त्यावरील १८ पैकी ६ एटीएम केंद्रांमध्येच रोकड

निश्चलनीकरणाच्या ५३ दिवसांनंतरही बहुतांश ‘एटीएम’मधून पैसे केव्हा मिळणार हा प्रश्न कायम आहे.

कोटक महिंद्रूा बँकेच्या एटीएम केंद्रातून नागरिकांना पैसे मिळत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्राचे शटर कुलूपबंद होते. (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे).

निश्चलनीकरणाच्या ५३ दिवसांनंतरही बहुतांश ‘एटीएम’मधून पैसे केव्हा मिळणार हा प्रश्न कायम आहे. शिवाजी रस्त्यावरील ६६ टक्के एटीएम रोख रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकापासून ते नरवीर तानाजी वाडी येथील साखर संकुल या शिवाजी रस्त्यावर १८ एटीएम केंद्रांपैकी एक तृतीयांश म्हणजेच सहा केंद्रांवरून पैसे काढता येत आहेत, असे चित्र सोमवारी अनुभवावयास मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करताना देशवासीयांकडून ५० दिवसांची मुदत मागून घेतली होती. ही मुदत ३० डिसेंबरला संपली असून आता नव्या वर्षांपासून आपल्याच खात्यातील पैसे एटीएमद्वारे काढता येतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, वर्षअखेर आणि नववर्षांरंभ शनिवार-रविवारी आल्यामुळे एटीएमच्या माध्यमातून पैसे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

त्यातच १ जानेवारीपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येतील, असा आदेश काढून केंद्र सरकारने नववर्षांची भेट जाहीर केली होती. मात्र, एटीएममधून सोमवारपासून पैसे मिळू शकतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार ज्या एटीएम केंद्रामध्ये पैसे उपलब्ध होते त्यातून पैसे मिळाले असले, तरी ही संख्या फारच मर्यादित होती. या केंद्रांची सोमवारी पाहणी केली असता शिवाजी रस्त्यावरील १८ पैकी जेमतेम सहा एटीएम केंद्राच्या माध्यमातून पैसे मिळाले.

निश्चलनीकरणाच्या ४० दिवसांनंतर ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीमध्ये बाजीराव रस्त्यावरील १६ पैकी केवळ एकाच एटीएम केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पैसे काढता येत होते. अर्थात या केंद्रावरही केवळ दोन हजार रुपये म्हणजे गुलाबी नोट मिळत होती. त्या तुलनेत सोमवारी शिवाजी रस्त्यावरील जी सहा एटीएम केंद्र सुरू होती, त्याद्वारे नागरिकांना कमाल साडेचार हजार रुपये काढता आले. ज्यांनी पैसे काढले त्यांना पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्या.

विविध बँकांच्या एटीएम केंद्राची सोमवारची स्थिती

एटीएम पाहणीची वेळ- सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड

(बँकेचे नाव, स्थळ आणि परिस्थिती या क्रमाने)

’ एसबीआय (राष्ट्रभूषण चौक)- एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता आले.

’ अ‍ॅक्सिस बँक (राष्ट्रभूषण चौक)- एटीएम केंद्र सुरू असले तरी पैसे काढण्यासाठी कुणी नव्हते.

’राजर्षी शाहू बँक (वनराज मंडळासमोर)- एटीएम केंद्र बंद.

’ आयडीबीआय (वनराज मंडळाशेजारी)- एटीएम केंद्र बंद.

’ स्टेट बँक ऑफ इंडिया (वनराज मंडळासमोर)- एटीएम केंद्रावरील दोन्ही यंत्रे बंद होती.

’ एचडीएफसी (शाहू चौक)- एटीएम केंद्र सुरू होते आणि नागरिकांना पैसे काढता आले.

’ टीजेएसबी (रामेश्वर चौकाजवळ)- एटीएम केंद्र बंद.

’ बँक ऑफ इंडिया (बेलबाग चौकाजवळ)- एटीएम केंद्रातील तीनही यंत्रे बंद होती.

’ इंड्सइंड बँक (रतन चित्रपटगृहाजवळ)- एटीएम बंद .

’ एचडीएफसी (रतन चित्रपटगृहाशेजारी)- एटीएम बंद.

’ स्टेट बँक ऑफ इंडिया (शनी मंदिराशेजारी)- एटीएम केंद्र बंद.

’एचडीएफसी (शनी मंदिराशेजारी)- एटीएम केंद्र बंद.

’ कोटक महिंद्रा बँक (शनी मंदिराशेजारी)- एटीएम केंद्र दुपारनंतर सुरू झाले.

’ अ‍ॅक्सिस बँक (शनिवारवाडय़ासमोर)- एटीएम केंद्र बंद होते.

’ कॅनरा बँक – (मंगला मल्टिप्लेक्सशेजारी)- एटीएम केंद्र दुपारनंतर सुरू झाले.

’ बँक ऑफ महाराष्ट्र (मॉडर्न कॅफेशेजारी- स. गो. बर्वे चौक)- रुपये काढता आले.

’ एचडीएफसी (शिवाजीनगर एसटी स्थानकासमोर)- एटीएम केंद्र बंद होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:45 am

Web Title: cash in 6 atm centers out of 18 on shivaji road
Next Stories
1 ‘मराठा-माळी’ वर्चस्ववादात जातीचे गणित प्रभावी
2 मार्केट यार्डातील उलाढाल घटली
3 शहरबात पुणे : अभय योजनेशिवाय उत्पन्न वाढणार का?
Just Now!
X