लोणावळ्यामधील जमीन बळकावण्याच्या आरोपांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी आयआरबी कंपनीच्या पुणे आणि मुंबईतील २१ कार्यालयांवर छापे टाकले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याही कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या सर्व ठिकाणी सीबीआयचे अधिकारी विविध कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. पुण्यातील मेहेंदळे गॅरेजजवळील मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अशी पाटी असलेल्या ठिकाणी सीबीआयचे अधिकारी सकाळपासून तपास करीत आहेत. कार्यालयाचे दरवाजे बंद असून, सकाळपासून अधिकारी आतमध्ये असल्याचे तेथील सुरक्षारक्षकाने सांगितले.
हत्या करण्यात आलेले माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी म्हैसकर यांच्या विरोधात जमीन बळकावण्याचा आरोप केला होता. जानेवारी २०१० मध्ये शेट्टी यांची तळेगावात हत्या करण्यात आली होती. या हत्येचे आरोपी अद्याप सापडलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआयने सोमवारी छापे टाकलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जमीन बळकावण्याच्या आरोपांचा फेरतपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी सीबीआयला दिला होता.
शेट्टी यांनी २००९ मध्ये जमीन बळकावण्याप्रकरणी आयआरबी कंपनीविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तींकडून देण्यात आली होती. पोलीसांनी त्यांना संरक्षण पुरवण्यास नकार दिल्यानंतर त्यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती.