भरधाव वेगात गाडीने दुसऱ्या गाडीला आठ वेळेस धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित चालक महिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या गाडीत कोणी नसल्याने अनुचित घटना टळली. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडली आहे. या घटनेप्रकरणी चालक स्वाती मिश्रा या महिलेच्या विरोधात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्श सुभाष चावला यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मिश्रा या गाडी भरधाव वेगात चालवत होत्या. तेव्हा, विहार सोसायटी च्या समोर रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीला त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांनी तब्बल मोटार पुढे मागे घेऊन तब्बल आठ वेळेस जोरात धडक दिली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या गाडीत कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संबंधित स्वाती यांनी तेथील सोसायटी धारकांना शिवीगाळ केल्याचंदेखील फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, जेव्हा स्वाती यांनी गाडीला जोरात धडक दिली त्यावेळेस सोसायटीमधील सुरक्षा रक्षक, आणि अन्य व्यक्ती बाहेर आल्या. मात्र, समोरील दृश्य पाहून त्यांना थांबवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. स्वाती या मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांचे पती सांगत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.