मध्यवर्ती भागातील चार मंडळांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागण्यास सुरुवात झाली आहे. अखिल मंडई मंडळ, हसबनीस बखळ मित्रमंडळ, त्वष्टा कासार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नेने घाट मंडळ ही शहराच्या मध्यवर्ती भागातील चार मंडळे यंदा सव्वाशेव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत.

सव्वाशेव्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या अखिल मंडई मंडळातर्फे काल्पनिक महाल साकारला जात आहे. विशाल ताजणेकर हा महाल साकारणार आहेत. मंडळाने यंदा दहीहंडी उत्सव साजरा केला नसला तरी रयत शिक्षण संस्थेच्या युनियन बोर्डिग येथील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसाहय़ हा सामाजिक उपक्रम राबविला असल्याचे मंडळाचे खजिनदार संजय मते यांनी सांगितले.

नेने घाट गणेश मंडळातर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त म्हैसूर येथील महालाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. अखेरच्या श्रावणी सोमवारी (३ सप्टेंबर) सव्वाशे रुद्रावर्तनाने उत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सव प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीमध्ये पूर्वाचलातील युवक सहभागी होणार असून, ते त्यांच्या प्रांतातील लोककलांचे दर्शन घडविणार आहेत. उत्सवकाळात दहा दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष मंदार परळीकर यांनी दिली.

शनिवार पेठेतील हसबनीस मंडळातर्फे दरवर्षी कोणताही देखावा करण्याऐवजी नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. मात्र, यंदा सव्वाशेव्या वर्षांनिमित्त भक्ती महाल हा देखावा साकारण्यात येणार आहे.

महाबलीपूरम मंदिराची प्रतिकृती

त्वष्टा कासार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे चेन्नई येथील महाबलीपूरम मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंडळातर्फे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातो. महिलादिनाचे औचित्य साधून गृहोपयोगी व्यवसाय करणाऱ्या ७० महिलांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवून या महिलांना लाभ मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे तांबट व्यावसायिकांच्या पारंपरिक भांडय़ांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते, असे मंडळाचे सचिव अंजलेश वडके यांनी सांगितले.