मूल्यांकनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यंदा राष्ट्रीय पातळीवरील निकाल ९९.३७ टक्के  लागला असून, निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १०.५९ टक्के  वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९९.३५ टक्के लागला. यंदाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला. बारावीच्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षेतील ४० टक्के, अकरावीतील गुणांसाठी ३० टक्के आणि दहावीतील गुणांसाठी ३० टक्के असे सूत्र ठरवून निकाल तयार करण्यात आला.

मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्के वारी जास्त आहे. उत्तीर्णांमध्ये ९९.६७ टक्के मुली आणि ९९.१३ टक्के मुली आहेत. नोंदणी केलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नोंदणी के लेल्या १७ हजार १६ परदेशी विद्यार्थ्यांपैकी ९९.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थ्यांना ९५ टक्के किं वा त्याहून अधिक, चारशे विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले.

सीबीएसईचे देशभरात सोळा विभाग आहेत. त्यात त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८७ टक्के  लागला. त्या खालोखाल बंगळूरु विभागाचा ९९.८३ टक्के आणि चेन्नई विभागाचा ९९.७७ टक्के निकाल लागला. ९९.३५ टक्क्यांसह पुणे विभाग दहाव्या स्थानी आहे. गेल्या वर्षी  पुणे विभागाचा निकाल ९०.२४ टक्के लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील निकालाप्रमाणेच पुणे विभागाचा निकालही उंचावला आहे.

श्रेणीसुधारासाठी…

निकालाची प्रक्रिया सुरू असलेल्या ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांचा निकाल ५ ऑगस्टपर्यंत जाहीर होणार आहे.  ६० हजार ४४३ खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर के लेल्या निकालाबाबत समाधानी नसलेले विद्यार्थी, एका विषयात श्रेणीसुधारासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.

आक्षेपांबाबत समिती…

विद्यार्थ्यांना निकालाबाबत काही आक्षेप असू शकतात. त्यामुळे त्या संदर्भात सीबीएसईकडून समिती नेमण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली.

दृष्टिक्षेपात… देशभरातील १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी के ली होती. निकाल जाहीर करण्यात आलेल्या १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.