पहिल्या तीन विश्व संमेलनामध्ये वापरण्यात आलेल्या बोधचिन्हामध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला यंदाच या बोधचिन्हामध्ये हा बदल का करावासा वाटला याचे गूढ कायम आहे.
महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याची ध्वजा फडकावत ठेवण्याच्या उद्देशातून विश्व साहित्य संमेलन ही संकल्पना अस्तित्वामध्ये आली. साहित्य महामंडळाचे कार्यालय औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेकडे असल्याने कौतिकराव ठाले-पाटील यांनी विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतला. त्यानुसार अमेरिकेतील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनासाठी पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार अभय जोशी यांनी चितारलेले चित्र हे बोधचिन्ह म्हणून वापरण्यात आले. त्यानंतर सिंगापूर आणि दुबई येथे सलग दोन वर्षे झालेल्या संमेलनासाठीही हे चित्र बोधचिन्ह म्हणून वापरले गेले.
सलग तीन वर्ष आपले चित्र वापरले जात असून त्याची योग्य ती दखल घेतली जावी, अशी अभय जोशी यांची अपेक्षा होती. या संदर्भात त्यांनी साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांना पाठविले होते. मात्र, या पत्राची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर महामंडळ कार्यालय पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले. साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला असून आता माझी कोणतीही तक्रार किंवा आक्षेप नाही. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या बे-एरिया मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे यांच्यामुळे मला हे बोधचिन्ह करण्याची संधी मिळाली, असे अभय जोशी यांनी सांगितले.   मात्र, आता विश्व साहित्य संमेलनासाठी नव्याने बोधचिन्ह करून घेताना संबंधित कलाकाराला योग्य तो सन्मान मिळावा, अशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून चार वर्षांच्या खंडानंतर आता अंदमान येथे सप्टेंबरमध्ये चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे. ऑफबिट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ या संमेलनाचे निमंत्रक आहेत. या संमेलनासाठी निमंत्रकांनीच स्वतंत्र बोधचिन्ह तयार करून घेतले आहे. विश्वाचे प्रतीक असलेला पृथ्वीचा गोल आणि त्यावर अधोरेखित केलेला मराठीचा ‘म’ अशा स्वरूपाचे हे बोधचिन्ह संदीप पानसे यांनी तयार केले आहे. चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांच्या उपस्थितीमध्ये या बोधचिन्हाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

विश्व साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये बदल करावासा वाटला म्हणून तो करण्यात आला आहे. त्यामागे कोणतेही कारण नाही किंवा हे बोधचिन्ह बदलायचेच अशीही भूमिका नाही, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.