राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रथमच घेण्यात येणाऱ्या माहिती संप्रेषण (आयसीटी) विषयाच्या परीक्षेमध्ये बदल करण्यात आले असून शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बदल केल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
केंद्र शासनाने इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योजना २००४ साली जाहीर केली. त्यानुसार राज्यात गेल्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये आयसीटीचा समावेश करण्यात आला आहे. मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये आयसीटीचीही परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण पन्नास गुणांच्या या परीक्षेमध्ये ४० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, अभ्यासक्रम अस्तित्वात येऊन, त्याची परीक्षा घेण्याची वेळ आली, तरीही शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभ्या राहिल्या नाहीत. त्यामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला (बोर्ड) आता परीक्षेमध्ये काही बदल करावे लागले आहेत.
बोर्डाने आयसीटीचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर जाहीर केला होता. मात्र, त्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या इंटरनेट आणि बाकी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळांनी अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रात्यक्षिकांएवजी फक्त पाठय़पुस्तकात दिलेल्या प्रात्यक्षिकांच्या आधारेच परीक्षा घ्यावी असे परिपत्रक बोर्डाने काढले आहे. शाळांमध्ये सुविधा उपलब्ध असतील अशीच प्रात्यक्षिके पाठय़पुस्तकात देण्यात आली आहेत, त्यामुळे शाळांना कोणतीही अडचण येणार नाही, असे बोर्डाने परिपत्रकात म्हटले आहे.