खासगी व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी महापालिकेची यंत्रणा काम करत असल्याचा प्रकार संभाजी उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळात उघड झाला असून मोटारींसाठी उभारण्यात आलेल्या या वाहनतळावर एका खासगी शोरूमच्या गाडय़ा गेली अनेक वर्षे पार्किंग करून ठेवल्या जात असल्याचे अचानक केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. हा गैरप्रकार उघड होताच अतिरिक्त आयुक्तांनी वाहनतळ सील केला असून या गैरप्रकाराची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संभाजी उद्यान परिसरातील वाहने व या भागातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने उद्यानाच्या जागेत यांत्रिक वाहनतळ (मेकॅनाइज्ड पार्किंग) उभा केला आहे. हा वाहनतळ उभारणीसाठी सन २००५ मध्ये दोन कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तो चालवण्यासाठी व देखभाल-दुरुस्ती आदी कामांसाठी एका खासगी कंपनीला दिला असून पहिल्या पाच वर्षांत वाहनतळ चालवणे व देखभाल-दुरुस्ती या कामांसाठी महापालिकेने कंपनीला लाखो रुपये दिले आहेत. कंपनीबरोबर केलेला करार सन २०१० साली संपल्यानंतर पुढील तीन वर्षे करारच करण्यात आला नाही आणि विनाकरार ही कंपनी वाहनतळ चालवत होती.
या वाहनतळाची ८० चारचाकी गाडय़ा उभ्या करण्याची क्षमता असून तळमजल्यावर गाडी उभी केल्यानंतर ती लिफ्टद्वारे ज्या मजल्यावर जागा असेल तेथे नेऊन ठेवली जाते. अशाच पद्धतीने गाडी नेण्यासाठी चालक आल्यानंतर ज्या मजल्यावर गाडी पार्क केली असेल तेथून ती खाली आणली जाते. संभाजी उद्यान व परिसरात येणाऱ्या नागरिकांना या वाहनतळाचा उपयोग व्हावा, या हेतून हा वाहनतळ उभारलेला असताना प्रत्यक्षात संबंधित खासगी कंपनीने एका कारशोरूम बरोबर अलिखित करार करून वाहनतळ या व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर वापरायला दिला आहे. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सर्वसामान्य नागरिकांना वाहनतळ बंद आणि खासगी व्यावसायिकाच्या शोरूममध्ये जागा नसल्यामुळे त्या व्यावसायिकाच्या नव्या कोऱ्या गाडय़ा वाहनतळावर असा प्रकार होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी आयुक्तांकडे केली होती. महापालिकेचे अधिकारी जाणूनबुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी वाहनतळाला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना खासगी व्यावसायिकाच्या नव्या कोऱ्या ५७ गाडय़ा वाहनतळावर उभ्या असल्याचे दिसले. हा गैरप्रकार लक्षात येताच बकोरिया यांनी वाहतळ सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाहनतळ सील करण्यात आला. हा वाहनतळ चालवण्यासाठी देताना जो करार झाला आहे तसेच जी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्याचीही चौकशी होणे आवश्यक असून फेरनिविदा काढून वाहनतळ चालवण्यास द्यावा, अशीही मागणी कनोजिया यांनी केली आहे.