जाहिरातीच्या माध्यमातून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘चेहरा ओळखा’ स्पर्धेत चेहरा ओळखल्याबद्दल आपल्याला टाटा सफारी गाडी किंवा त्या गाडीची किंमत देण्याचे आमिष दाखवून ठकाने आपल्या बँक खात्यामध्ये ६२ हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
नर्गिस नायर (वय ३६, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मार्केट यार्ड पोलिसांनी दूरचित्रवाणी वाहिनीवरील सुशांत असे नाव सांगणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ मे ते २७ मे या कालावधीत ही फसवणूक झाली आहे.
नर्गिस नायर या राहत्या घरी दूरचित्रवाणी वाहिनीवर कार्यक्रम पाहत असताना सुशांत असे नाव सांगणारा मोबाइल त्यांना आला. ‘चेहरा ओळखा’ अशी बनावट स्पर्धा असलेली मालिका दाखवून त्याद्वारे सुशांत याने नायर यांना चेहरा ओळखायला लावला. नायर यांनी हा चेहरा ओळखला. तेव्हा सुशांत याने त्यांना तुम्ही टाटा सफारी गाडीजिंकली असल्याचे सांगितले. ही गाडी नको असल्यास त्या गाडीची किंमत १४ लाख ८० हजार रुपये देण्याचे आमिष नायर यांना दाखविले. त्यासाठी आपल्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्यावर ६२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले आणि नायर यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक ए. जे. पवार पुढील तपास करीत आहेत.