News Flash

खासगी शिकवण्यांमुळे संशोधनवृत्तीला खीळ

‘प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांनी एकप्रकारे कैद केले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे टीकास्त्र

‘प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांनी एकप्रकारे कैद केले आहे. या शिकवण्या विद्यार्थी नाही तर परीक्षार्थी तयार करत असून मुलांच्यातील संशोधन वृत्ती मारत आहेत,’ अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे (एआयसीटीई) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ या योजनेचा शुभारंभ जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जावडेकर बोलत होते. एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आर. सुब्रमण्यम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, एआयसीटीईचे ओमप्रकाश मित्तल, रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीचे रवींद्र साठे, आयफोरसीचे अध्यक्ष डॉ. अरुण जामकर, हॅकेथॉन संयोजन समितीचे सचिव डॉ. अभय जेरे आदी उपस्थित होते. या वर्षी हॅकेथॉनमध्ये केंद्रीय मंत्रालयाला भेडसावणाऱ्या ५३ आणि राज्यांना भेडसावणाऱ्या २२ समस्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी तोडगा काढायचा आहे.

जावडेकर म्हणाले, ‘संशोधन हाच भारताच्या प्रगतीचा मार्ग आहे. त्यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अधिकाधिक अनुभव मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवण्या आठवीपासूनच विद्यार्थ्यांना जखडून ठेवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधनाला खीळ बसत आहेत.’

सुब्रमण्यम म्हणाले, ‘जगात संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर यामध्ये भारत खूप मागे आहे. आपली शिक्षण पद्धती ही पाठय़पुस्तकांवर आधारित आहे. नोकरी मिळवण्यासाठी पुस्तकांची घोकंपट्टी करून गुण मिळवायचे असेच देशात सुरू आहे. मात्र सातत्याने व्यवहार्य संशोधन केल्याशिवाय ‘स्टार्टअप इंडिया’ला गती मिळणार नाही. त्याचबरोबर रोजगारनिर्मितीही होणार नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2017 2:06 am

Web Title: children research attitude hit by private tuition says prakash javadekar
टॅग : Prakash Javadekar
Next Stories
1 संरक्षण मंत्रालयाकडे परवानगी प्रलंबित
2 पेटत्या आकाशदिव्यांवर बंदी
3 नागरिक वारंवार तक्रारी का करीत आहेत?
Just Now!
X