पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे प्रतिपादन

‘आपण आपल्या कुटुंबामध्येच मुलीला गप्प बसण्यास शिकवतो. त्यामुळे शोषणाविरोधात बोलण्याचे तिचे धाडसच संपून जाते. मुलांना आपण स्त्रियांचा सन्मान करण्यास शिकवलेच पाहिजे. तसेच मुलींमध्ये सर्व प्रकारच्या अत्याचाराविरोधात उभा राहण्याचे धाडस वाढवले पाहिजे,’’ असे प्रतिपादन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.

महिला हिंसाविरोधी पंधरवडा २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत पाळला जातो. या निमित्ताने महिला हिंसाचाराविरोधात काम करणाऱ्या वीसहून अधिक संस्थांनी एकत्र येऊन ‘इरेज द शेम- बिनधास्त बोल’ हे अभियान सुरू केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी शुक्ला बोलत होत्या. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ, ‘मासूम’ संस्थेच्या सहसमन्वयक मनीषा गुप्ते, ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’च्या रत्ना यशवंते, तसेच महिला व बाल विकास आयुक्तालयाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

शुक्ला म्हणाल्या, ‘‘भेदभावाची सुरुवात कुटुंबातच होत असते. आपण आपल्या मुलींची शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी किती प्रयत्न करतो?, किती कुटुंबांमध्ये मुलींना स्वसंरक्षण शिकण्यासाठी आणि स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते? मुलांना आपण स्त्रियांचा सन्मान करण्यास शिकवलेच पाहिजे. तसेच मुलींमध्ये सर्व प्रकारच्या अत्याचाराविरोधात उभा राहण्याचे धाडस वाढवले पाहिजे. पालकांनी मुलीवर विश्वास ठेवला पाहिजे. तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.’’

‘बिनधास्त बोल’ हे हिंसाग्रस्त स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात धाडसाने बोलण्यासाठी एक व्यासपीठ आहे, असे विद्या बाळ यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाला (१० डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालय येथे मेळावा घेऊन अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

महिलांचा होणारा लैंगिक छळ आणि हिंसाचार या घटनांची (पाठलाग, चोरून पाहणे इ.) नोंद करण्यासाठी ९२२३३०००७५ या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊ शकता, तसेच १८००२००००५८ ‘टोल फ्री’ क्रमांकावर दूरध्वनी करून आपली कहाणी सांगू शकता.