पिंपरी पालिकेच्या ‘लक्ष्य २०१७’ ला सामोरे जाण्यापूर्वी रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या चिंचवड पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप-शिवसेना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरासमोर ठाकले असून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रभागात तळ ठोकल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या टप्प्यात होणारे ‘अर्थकारण’ खऱ्या अर्थाने निकालाची दिशा ठरवणार आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे पद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या जागेवर शेट्टी निवडून आले. तथापि, माजी खासदार गजानन बाबर, भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी शेट्टी यांच्या निवडीस आक्षेप घेतला होता. बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर शेट्टी यांचे पद घालवण्यात ते यशस्वी ठरले. या रिक्त जागेसाठी रविवारी (१७ एप्रिलला) मतदान होणार असून सोमवारी मतमोजणी आहे. पिंपरी पालिकेच्या निवडणुका दहा महिन्यांवर आल्या आहेत. पालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्या युध्दापूर्वीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादीचे दत्तू मोरे, काँग्रेसचे सतीश भोसले, शिवसेनेचे राम पात्रे, भाजपचे भीमा बोबडे असे प्रमुख उमेदवार िरगणात आहेत. दहा हजार २०० मतदार असलेल्या या प्रभागात विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, रामनगर, परशुरामनगर आदी भाग समाविष्ट आहे. वडार तसेच मातंग समाजाचे प्रभागात प्राबल्य असून अधिकतर भाग झोपडपट्टीचा आहे. तेथील मतदार आकृष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उरलेल्या दोन दिवसांत त्यात मोठी वाढ होईल, असे दिसते. निवडणुकीचे खरे ‘अर्थकारण’ सुरू झाले असून शेवटच्या टप्प्यात पैशावर मिळणारी मते निर्णायक ठरणार असून त्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष आहे.
यापूर्वी, चिंचवडच्याच मोहननगर प्रभागाची पोटनिवडणूक झाली. अटीतटीच्या लढतीत ती जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, त्यांच्यातील मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला झाला. काँग्रेसचा उमेदवार िरगणात नव्हता, ते राष्ट्रवादीच्याच पथ्यावर पडले. आता विद्यानगरची जागाही राष्ट्रवादीला राखायची आहे. तथापि, भाजप व शिवसेनेचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे आहे आणि या वेळी काँग्रेस उमेदवारही लढतीत आहे. शिवसेनेचे उमेदवार राम पात्रे यांच्याविषयी प्रभागात सहानुभूती आहे, शिवसेनेने संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावली आहे. बोबडे यांच्यासारखा ताकतीचा उमेदवार मिळवल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच चुरस निर्माण झाली असून निकालाविषयी उत्सुकता आहे. सलग चौथी पोटनिवडणूकजिंकून पालिकेच्या आगामी निवडणुकाजिंकण्याची दौड कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर, ती परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा आहे. कडक उन्हाळा आणि पोटनिवडणुकीविषयी असलेला अनुत्साह पाहता मतदानाची टक्केवारी कितपत राहील, कोणाच्या पदरात यशाचे माप पडेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.