पालिकेच्या निर्णयाने रसिकांची गैरसोय

िपपरी पालिकेचे चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृह दुरुस्ती तसेच सुशोभीकरणाच्या कामासाठी पाच जूनपासून बंद ठेवण्यात येणार आहे. ते नेमके किती दिवस बंद राहणार, याची स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सर्व दृष्टीने सोयीचे असलेले मोरे नाटय़गृह बराच काळ बंद राहणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच नाटय़प्रेमी रसिक प्रेक्षकांची मोठी गैरसोय होणार आहे.

चिंचवड नाटय़गृहाची अवस्था गेल्या काही दिवसांपासून दयनीय अशी झाली आहे. नाटय़गृहातील ध्वनिक्षेपक यंत्रणा सातत्याने नादुरुस्त असते. वातानुकूलित यंत्रणा नावापुरती राहिली असून त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. स्वच्छतेच्या कामांविषयी सातत्याने तक्रारी होतात. येथील खुच्र्या आरामदायी नाहीत, अशी ओरड नेहमी होते. यांसारख्या अनेक तक्रारी होत असताना प्रशासनाने नाटय़गृहात एकत्रितपणे दुरुस्तीची कामे करण्याचे ठरवले; त्यासाठी सुरुवातीला ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाटय़गृहाच्या खुच्र्या बदलण्यात येणार आहेत. याशिवाय पडदे, मॅटही बदलणार आहेत. बाह्य़ व अंतर्गत भागातील रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

त्यामुळे जूनपासून नाटय़गृहाच्या तारखा वितरित करण्यात आलेल्या नाहीत. तथापि, नेमके किती दिवस काम चालणार, याचे नियोजन अद्याप झालेले नाही. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. चिंचवड नाटय़गृह बंद असताना पर्यायी व्यवस्था नसल्याने रसिकांची मोठी गैरसोय होणार आहे.