जैव विविधता सध्या मोठय़ा प्रमाणावर नष्ट होत असून, ती वाचविण्यासाठी प्राधान्याने संशोधन करणे गरजेचे आहे. वनविभागात चांगल्या संशोधकांची वानवा आहे. त्यामुळे चांगल्या संशोधकांनी पुढे यावे, असे आवाहन निवृत्त वनाधिकारी व वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी केले.
अॅड-व्हेंचर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आठवा ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ निसर्ग अभ्यासक व संशोधक डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना कुकडोलकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे, अनिल गोहाड, गार्डियन कॉर्पोरेशनचे संचालक अनिष साबडे या वेळी उपस्थित होते.
कुकडोलकर म्हणाले, की जैव विविधता वाचविण्यासाठी चांगला संशोधक असणे, ही आता काळाची गरज झाली आहे. आजच्या युवा पिढीमध्ये व पुण्यामध्ये कर्तृत्ववान लोक आहेत. अशा लोकांनी पुढे आले पाहिजे. त्याचप्रमाणे वन विभागाकडील बजेटही अत्यंत तुटपुंजे आहे. त्यामुळे या संशोधकांना आर्थिक मदत करण्यासाठीही अनेकांनी पुढे येण्याची गरज आहे.
कुंटे यांच्याविषयी ते म्हणाले, की कुंटे यांनी फुलपाखराबाबत जे अनुभवले व संशोधन केले ते लोकांसमोर मांडण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्या पर्यटनाच्या धोरणामध्ये वाघ पाहण्यासाठी अनेकांची धडपड असते. त्यासाठी पैसे घालविण्यासही लोक तयार असतात. पण, वाघच नाही, तर आपल्या आजूबाजूला अनेक सुंदर गोष्टी व जीव आहेत. त्याचाही अनुभव घेतला पाहिजे.
कार्यक्रमाच्या शेवटी कुंटे यांनी त्यांची फुलपाखराबाबत केलेले संशोधन त्याचप्रमाणे एकूणच संशोधनाची सुरुवात व त्यातील विविध टप्प्यांबाबत माहिती दिली.