चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून हा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारानेच केला असल्याचं समोर आलं आहे. मुख्य आरोपीला दीड वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होतं. त्याचा राग मनात धरून आनंद उनवणे यांचे इतर चार जणांच्या मदतीने अपहरण करण्यात आले होते व त्यानंतर धावत्या मोटारीत दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल २ हजार सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केल्याचंही समोर आलं आहे. मात्र अद्याप मुख्य सूत्रधार आरोपी प्रभू पुजारी हा फरार असु, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी उमेश सुधीर मोरे, बाबु ऊर्फ तुळशीराम नथुराम पोकळे, सागर दत्तात्रय पतंगे, दिपक धर्मवीर चांडालिया यांना अटक करण्यात आली असून, अपहरणातील सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

३ फेब्रुवारी रोजी आनंद उनवणे यांचे त्यांच्या राहत्या घराच्या खालून, मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने इतर चार साथीदारांच्या मदतीने रात्री अपहरण केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आनंद उनवणे यांना ऑफिसमधील कर्मचाऱ्याला फोन करण्यास भाग पाडून खंडणीपोटी ४० लाखांची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आली. चालकाने ती रक्कम राहत्या घराच्या खाली पार्क केलेल्या मोटारीच्या पुढील सीटवर ठेवली. त्यानंतर, आरोपी उमेश सुधीर मोरे व दीपक चांडालिया या दोघांनी ती रक्कम आणली. दरम्यान त्याच रात्री आरोपी सुधीर मोरे आणि सागर पतंगे यांनी आनंद उनवणे यांच्याकडून राहत्या फ्लॅटची चावी घेऊन तिथून देखील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. आरोपींनी असा एकुण ६४ लाखांचा मुद्देमाल जवळ बाळगला होता.

सर्व रक्कम आल्यानंतर आरोपी आनंद उनवणे यांना दिनांक ४ फेब्रुवारी रोजी मोटारीतून हिंजवडी येथून ताम्हणी घाटात घेऊन गेले. तिथे मोटारीतच उनवणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याचा हेतून त्यांचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह महाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावित्री नदीमध्ये फेकून देण्यात आला.
दरम्यान, उनवणे यांचा मोबाईल एका धावत्या ट्रकमध्ये फेकून देण्यात आला. जेणेकरून त्याचे लोकेशन वेगळ्या ठिकाणी येऊन पोलिसांची दिशाभूल होईल. हे सर्व प्रकरण दिनांक ६ फेब्रुवारी रोजी उजेडात आलं आणि त्यांचा मृतदेह नदीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. महाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. तर, पिंपरी आणि खंडणी पथकाने तपासाची चक्रे फिरवली, तब्बल दोन हजार सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर, संबंधित सात जणांना ताब्यात घेण्यात आले. तर, मुख्य आरोपी हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाने केली आहे.