पाच लाख मिळकतींचा टप्पा गाठला, लोकसंख्या २२ लाखांच्या घरात

पिंपरी : वेगाने नागरिकीकरण होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींची संख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. मिळकतींची संख्या गेल्या दहा वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. पुण्या-मुंबईच्या जवळचे शहर, चांगल्या सुविधा, प्रशस्त रस्ते, राहण्यायोग्य आणि व्यवसाययोग्य मुबलक सुविधा शहरात असल्याने नागरिकांची पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती मिळत आहे. दुसरीकडे वाढते नागरिकीकरण व लोकसंख्येमुळे शहरातील नागरी सुविधांवर ताण पडत असल्याचे चित्रही समोर आले आहे.

वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर १९९७ मध्ये पालिकेची हद्दवाढ झाली होती. आता हिंजवडी, देहूसह लगतची सात गावे महापालिकेत येण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शहराचा पसारा आणखी वाढणार आहे. शहरातील मिळकतींची संख्या वाढत आहे आणि बेकायदा बांधकामांचे मोठी संख्या त्यात भर घालत आहे.

मिळकतींच्या सर्वेक्षणात अनेक नव्या मिळकतींचा शोध लागला. २०११-१२ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत मिळकतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या चार लाख ८३ हजार इतकी होती. आता हा आकडा पाच लाखांच्या घरात आहे. यामुळे एकीकडे पालिकेचे उत्पन्न वाढणार असले तरी वाढत्या पसाऱ्यामुळे आवश्यक नागरी सुविधा पुरवताना पालिकेची दमछाक होणार आहे. सध्याचा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, सांडपाण्याची समस्या ही त्याचीच उदाहरणे म्हणून सांगता येतील.

शहरातील मिळकती वाढत आहेत, लोकसंख्येतही भर पडत आहे. त्या तुलनेत नागरी सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे. नियोजनाअभावी ताण पडू शकतो. पिंपरी पालिकेकडून नागरी सुविधांची पूर्तता करण्याबाबत  नियोजन सुरू आहे.

– दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी महापालिका