शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे प्रत्यक्ष स्थान (लोकेशन) नागरिकांना आता सहज कळणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृहांचे स्थान गुगल नकाशाला (गुगल मॅप) जोडण्यात आल्यामुळे नागरिकांना मोबाइलद्वारे स्वच्छतागृहांच्या स्थानाची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोयही दूर होणार असून पहिल्या टप्प्यात शहरातील ९५ टक्के स्वच्छतागृहांचे स्थान गुगल मॅपवर दिसत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृह मिळणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. अपुरी, गल्लीबोळात असलेली स्वच्छतागृहे शोधण्यात नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छतागृहे सहज सापडत नसल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) अंतर्गत शहरातील १ हजार ४७४ स्वच्छतागृहे गुगल मॅपवर दिसणार आहेत. या स्वच्छतागृहांची नोंद ‘एसबीएम टॉयलेट’ म्हणून दर्शविण्यात आली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत शहर स्वच्छतेसंदर्भात काही प्रश्न नागरिकांना विचारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधण्यासाठी गुगल नकाशाचा वापर केला जातो का, असा एक प्रश्न आहे. या प्रश्नाला अनुसरून सर्वेक्षणापूर्वीच १ हजार ४७४ स्वच्छतागृहे गुगल मॅपवर जोडण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचे रस्त्यावरील, चौकातील किंवा गल्लीबोळातील प्रत्यक्ष स्थान नागरिकांना मोबाईलवर दिसणार आहे.

सध्या नागरिकांकडून स्मार्ट फोनचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात येतो. नागरिकांच्या तक्रारी आणि स्वच्छ सर्वेक्षणातील निकषांची पूर्तता करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. शहरातील १ हजार ४७४ स्वच्छतागृहांपैकी ९५ टक्के स्वच्छतागृहे गुगल नकाशावर दिसत आहेत. गल्लीबोळातील काही स्वच्छतागृहे गुगल नकाशावर दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामागील तांत्रिक कारणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

 

पुढचा टप्पा

शहरातील स्वच्छतागृहांची माहिती देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतागृह किती अंतरावर आहे, हे दर्शविणारे फलक बहुतांश ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे फलक नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्या पुढचा टप्पा म्हणून स्वच्छतागृहे गुगल नकाशावर घेण्यात आली आहेत.

असुविधांचा प्रश्न कायम

दर दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर दुतर्फा स्वच्छतागृहे असावीत, असा निकष आहे. शहरातील दाट लोकवस्ती, उपलब्ध जागांचा विचार करता या निकषानुसार बहुतांश रस्त्यांवर स्वच्छतागृहे नाहीत. काही ठिकाणी अडीच किलोमीटर अंतराच्या आत सलग दोन स्वच्छतागृहे असल्याची विसंगतीही पुढे आली आहे. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाणही तुलनेने खूपच कमी आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि असुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सुविधा उपलब्ध करून देण्याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.