ललित संगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक असणे आवश्यक आहे. चांगल्या गाण्याचा शास्त्रीय संगीत हाच पाया आहे. मात्र केवळ शास्त्रीय संगीत शिकून उपयोग नाही, तर शिक्षणाचा उपयोग करण्याचा दृष्टिकोन विकसित व्हायला हवा, असे मत प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी मांडले.

‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या उपक्रमात बेला शेंडे यांच्याशी प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी संवाद साधला. शब्दसुरांच्या या मैफिलीत बेला यांचा संगीत प्रवास उलगडला. गाण्यांच्या निर्मितीमागील किस्से, ज्येष्ठ गायक इलाय राजा, ए. आर. रेहमान यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगतानाच त्यांनी ‘वाजले की बारा’, ‘ओल्या सांजवेळी’, ‘पांडुरंग नामी लागलासे ध्यास’ अशी उत्तमोत्तम गाणीही गायली.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

दूरचित्रवाणीवरील गायन स्पर्धेतून बेला यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. बेला म्हणाल्या, की ‘जोधा अकबर’ या चित्रपटातील ‘मन मोहना’ या गाण्याच्या निमित्ताने ए. आर. रेहमान यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली. त्या गाण्याचे रात्रभर जवळपास नऊ तास मुद्रण झाले. दक्षिणेतील संगीतकारांकडे गाण्याच्या निमित्ताने शिस्तबद्ध संस्कृती अनुभवली. इलाय राजा त्यांच्या संगीत रचनेबाबत अतिशय काटेकोर आहेत. त्यांच्या रचनेनुसारच गाणे गावे लागते. त्यांच्यासह काम करणे हा कमालीचा अनुभव होता. मला दक्षिणेतील भाषा येत नसल्याने शब्दोच्चार, अर्थ समजून घेऊन गाणे गावे लागते.

आताच्या काळात फार कमी वेळा गाणे आधी मिळते. खरेतर गाणे गायकाच्या गळ्यात मुरले पाहिजे. पण आता स्टुडिओत जाऊन संगीतकाराकडून गाणे शिकू न लगेचच गावे लागते. गायकाला शब्द, संगीत, भावना समजून घेऊन गाण्यात स्वत:चे योगदान गाण्यात द्यावे लागते. काही वेळा गायक-संगीतकार यांच्यातील सांगीतिक आदानप्रदानातून गाणे तयार होते, असे मत बेला यांनी मांडले.

गाण्याच्या प्रकारानुसार गायकाला आवाजात बदल (व्हॉइस मॉडय़ुलेशन) करावे लागतात. म्हणूनच तीन मिनिटांचे गाणे गाणे अवघड आहे. जिंगल, मालिकांची शीर्षकगीते अशा प्रत्येक माध्यमाची नशा वेगळी आहे. रवी दाते, वडील संजीव शेंडे यांच्याकडून उर्दू शिकले. त्यामुळे हिंदी उच्चार चांगले होण्यास मदत झाली. शांता शेळके,रमण रणदिवे, स्वानंद किरकिरे, गुरू ठाकूर, अश्विनी शेंडे अशा अनेक गीतकारांचे सकस शब्द गायला मिळाले. शब्दांत ताकद नसेल, तर कितीही चांगले संगीत असले, कितीही चांगले गायले तरी उपयोग नसतो, असे त्यांनी सांगितले.

समाजमाध्यमांत आपल्या गाण्याचा प्रचार करावा असा विचार असतो. पण रसिकांना जे आवडायचे तेच आवडते. गाण्याचा प्रचार करण्यापेक्षा चांगली कलाकृती करण्यावर भर असला पाहिजे. काही वेळा गाणे झटपट लोकप्रिय होते, तर काही वेळा वेळ जातो, असे बेला म्हणाल्या.

चांगली भूमिका मिळाल्यास अभिनय करायला आवडेल

गाणं हेच पहिलं प्रेम. त्यातच व्यग्र आहे. त्यामुळे अभिनय करण्याचा कधी विचार के ला नाही. भूमिकांसाठी अनेकदा विचारणाही झाली. पण एखादी भूमिका मला मनापासून आवडली तरच ती करायला आवडेल, अशी भावनाही बेला यांनी व्यक्त केली.

आव्हानात्मक ब्रेथलेस गाणे..

शंकर महादेवन यांच्या ब्रेथलेस गाण्यावरून प्रेरित झालेले तेजस चव्हाण आणि प्राजक्ता गव्हाणे यांनी मराठीत ब्रेथलेस गाणे तयार केले होते. त्यांना ते मीच गायला हवे होते. त्यामुळे ते गाणे गाण्यासाठी होकार दिला. त्या गाण्याचा जवळपास चार महिने अभ्यास करावा लागला. तरीही प्रत्यक्ष गाणे आव्हानात्मक होते. गाणे प्रसिद्ध झाल्यावर रसिकांना खूप आवडले. ज्येष्ठ गीतकार-लेखक जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासारख्यांकडून या गाण्याला दाद मिळाली, असे बेला म्हणाल्या.

माणसे वाचण्याचा छंद

मला पुस्तके वाचायला आवडतात. त्यात कविता, हिंदी शायरीची पुस्तके वाचते. कवितेतील रस, प्रत्येक कलाकृतीतील रस मनसोक्त लुटते. पण मला माणसांना वाचायला आवडते. त्यातून आपण समृद्ध होतो. कारण माणूस हे सर्वात व्यामिश्र पुस्तक आहे, असे बेला यांनी सांगितले.

‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या उपक्रमाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सहप्रायोजक आहेत.