करोनाचा कहर आणि त्यातच ऊन-पावसाचे मिश्र हवामान यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली होती. पण राज्यात आता बहुतांश भागात कोरडे हवामान निर्माण झाले आहे.

प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात पावसाळी स्थिती दूर होऊन उन्हाचा चटका वाढला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे. विदर्भातही तापमानात वाढ होत असली, तरी काही भागात अद्यापही तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्याच्या सर्वच भागामध्ये चार दिवसांपूर्वी पावसाळी स्थिती होती. त्यापूर्वी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले होते. काही भागात उन्हाचा चटका, तर काही ठिकाणी पावसाळी स्थितीमुळे विचित्र हवामान निर्माण झाले होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांनंतर सर्वच ठिकाणी निरभ्र आकाश राहील. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होऊ शकते.

पारा चाळिशीच्या आसपास

निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. सोलापूर येथे तापमान ४० अंशांपुढे गेले असून, रविवारी तेथे उच्चांकी ४१.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्याचा पाराही ३९.३ अंशांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये ३८.४ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक असल्याने उकाडा वाढला आहे. कोकण विभागात मुंबईत दिवसाचे तापमान सरासरीपुढे असून, रविवारी ते ३३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशांवर आहे.