पुणे : अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर मोसमी वाऱ्यांचे आगमन लांबणीवर पडणार किंवा कसे?, अशी चर्चा सुरू असतानाच मोसमी वारे येत्या शुक्रवापर्यंत (२१ मे) अंदमानच्या बेटावर दाखल होणार असल्याचे मंगळवारी हवामान विभागाने जाहीर के ले. तसेच के रळात नियमित वेळेच्या एक दिवस आधी मोसमी वारे दाखल होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकू न जमिनीवर आले. हे वादळ गुजरातमध्ये घोंगावून त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जाणार आहे. हे वादळ शमण्यास सुरुवात झाली असतानाच दक्षिण अंदमान समुद्रात मोसमी वारे दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. या भागात विषुववृत्ताकडून वाऱ्याचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. अंदमान-निकोबार बेटांवर १८ ते २० मे पर्यंत मोसमी वारे दाखल होत असतात. रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती सुरू होण्याचे संके त आहेत. पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली तीव्र होणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के  पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.