बुलेटसह दरीत उडी; आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट
पुणे : वाघोलीतील एका महाविद्यालयातून बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन युवकाने मुळशीतील मुठा घाटात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. युवकाने बुलेटसह मुठा घाटात उडी मारली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
अपूर्व श्रीकांत गिरमे (वय १९,रा.गोकुळनगर, विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अपूर्व वाघोलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. २० जानेवारी रोजी तो महाविद्यालयात गेला. प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम आहे,असे त्याने मित्राला सांगितले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वडिलांनी अपूर्वच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याने वडिलांना मोबाईलवर संदेश पाठवून मोबाईल संच बंद केला.
त्यानंतर तांत्रिक तपासात अपूर्व त्याच्या बुलेटसह पौडजवळील मुठा घाटात असल्याची माहिती मिळाली होती. त्याचे कुटुंबीय मुठा घाटात गेले. त्यांच्याबरोबर पौड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लवटे, पोलीस हवालदार सुनील मगर, बनसोडे, पवार, देवकाते होते. पोलिसांच्या पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. शनिवारी (२५ जानेवारी) मुठा घाटातील दरीत शोध घेतल्यानंतर बुलेट जळालेल्या अवस्थेत सापडली. अपूर्वचा मृतदेह सापडला असून मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आहे.
त्याने बुलेटसह घाटातील दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पौड पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.