ढोलताशे पथकांच्या संदर्भात नियम करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून त्यांना समन्वयातून मार्ग काढण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली.
ढोलताशा पथकांकडून सराव करत असताना होत असलेल्या मोठय़ा आवाजाचा स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी ढोलताशा पथकांना नोटिसा दिल्या असल्याने दोन दिवसांपासून पथकांचा सराव बंद आहे. याबाबत पथकाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.
याबाबात पोळ म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या ढोलच्या आवाजाबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर पथकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी त्यांना कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर पथकांमध्ये ठराविक ढोल ठेवा, लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करू नये, असे सांगण्यात आले आहे. पथकांच्या मागणीवर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी अ‍ॅड. प्रताप परदेशी, रोहित टिळक आणि पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांची समिती नेमण्यात आली आहे. एका मंडळासमोर किती पथके असावीत, पथकांमध्ये किती ढोल असावेत यासंदर्भात चर्चेतून ही समिती निर्णय घेणार आहे. पोलिसांना कोणाच्याही उत्साहामध्ये विसर्जन आणायचे नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.
ढोल-ताशा पथकाचे सचिव पराग ठाकूर यांनी सांगितले की, पोलिसांनी पथकांना दिलेल्या नोटिशीत एका ठिकाणी २५ पेक्षा जास्त ढोल असू नयेत. त्याच बरोबर एका ठिकाणी एकाच पथकाने सराव करावा. लॉन मालकांनाही पोलिसांनी सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस दिली असून एका ठिकाणी एका पेक्षा जास्त पथकांना परवानगी देऊ नये म्हणून नोटीस दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ढोलताशा पथकाचे सराव बंद आहेत. याबाबत ढोलताशा पथकाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी आयुक्तांनी तीन सदस्यांची एक समिती नेमली आहे. तिची बुधवारी बैठक होणार आहे. पोलिसांनी मिरवणुकीत पथकांमध्ये २५ ढोल असावेत, असे सांगितले आहे. तर, पथकांकडून ७५ ढोलची मागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.