राज ठाकरे यांनी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे कार्यकर्तेही कामाला लागल्याचं दिसत आहे. मुंबई पाठोपाठ मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात तिघांना पकडलं होतं. हे तिघे बांगलादेशी असल्याच्या संशयातून मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही धरपकड आता कार्यकर्त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेनं घुसखोरांना देशातून बाहेर काढावे, या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर पोलिसांबरोबरच मनसेचे कार्यकर्तेही घुसखोरांना शोधण्याच्या कामात लागले आहेत. मुंबईत काही घुसखोर पकडल्यानंतर पुण्यातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीन जणांना बांगलादेशी घुसखोर असल्याचं सांगत पकडलं होतं.

पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी शोधलेल्या तिघांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. पोलिसांनी तिघांची तब्बल सहा तास चौकशी केली. त्यात ते भारतीयच असल्याचे सिद्ध झालं. ते उत्तर प्रदेश आणि कोलकता असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर यातील रोशन शेख याने मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी घरात घुसून बाहेर काढलं. त्याचबरोबर आपल्याला बांगलादेशी संबोधल्याचं शेख याने तक्रारीत म्हटलं आहे.

पोलीस काय म्हणाले होते?

सहकार नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांनी या प्रकरणात बोलताना सांगितलं होतं की, तिघांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी संशयित घुसखोर बांगलादेशी म्हणून, घटनास्थळी आमच्या ताब्यात दिले. त्यानंतर आम्ही त्यांची कसून चौकशी केली. ते उत्तर प्रदेश आणि कोलकता येथील असल्याचे कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट झाले आहे. ते शहरात काही व्यवसाय करीत आहेत. त्या तिघांना आम्ही सोडून दिले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.