विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठीच विरोध सहन करुन अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या गेल्या. त्यात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. प्रसंगी वेळापत्रक बदलून परीक्षा घेतल्या. जेईई आणि नीट परीक्षांचेही आयोजन केले. या परीक्षाही यशस्वीरीत्या पार पडल्या. योग्य ते निर्णय घेतल्यामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. पोखरियाल बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी सूत्रसंचालन, सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.

सर्व घटकांचा विचार करून शैक्षणिक धोरण निर्मिती..

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत डॉ. पोखरियाल यांनी माहिती दिली. या धोरणानुसार विद्यार्थ्यांला रिपोट कार्ड नाही तर प्रोग्रेस कार्ड दिले जाईल. देशातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच समाजातील सर्व घटकांचा विचार करून शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शिकता येईल, अशी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असे ते म्हणाले.