कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी महापालिका आठवडाभरात जागतिक स्तरावर निविदा मागवणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी शुक्रवारी मुख्य सभेत दिली. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम एका परदेशी कंपनीला देण्यासाठीच शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत होता. या माहितीमुळे कचरा प्रक्रियेसाठी पुण्यात लवकरच परदेशी कंपनी येणार असल्याच्या चर्चेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.
‘परदेशी कंपनीसाठी कचराकोंडीचा घाट!’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने गेल्या रविवारी प्रसिद्ध केले होते. शहरात निर्माण झालेला कचऱ्याचा प्रश्न तातडीने न सोडवता तो आस्ते आस्ते सोडवला जात होता आणि दुसरीकडे परदेशी कंपनीमार्फत त्यांच्या प्रकल्पाचे सादरीकरणही काही उच्चपदस्थ व अधिकाऱ्यांपुढे महापालिकेत सुरू होते. त्यामुळे परदेशी कंपनीला काम देण्यासाठीच शहरातील कचऱ्याचा प्रश्न चर्चेत ठेवण्यात आला असल्याचा संशय महापालिकेत व्यक्त होत होता.
कचऱ्याच्या प्रक्रियेचे काम करत असलेल्या हंजर कंपनीला दर वाढवून देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्य सभेपुढे आल्यानंतर अनेक सदस्यांनी विविध आक्षेप उपस्थित केले. त्याबाबत निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले की, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये या विषयाबाबत मोठी चर्चा झाली. त्यामुळे कचरा प्रक्रियेची तयारी दाखवणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, कंपन्यांचे प्रस्ताव महापालिकेकडे येत आहेत. अनेकांकडून ई-मेलद्वारेही प्रस्ताव आले आहेत. जागतिक स्तरावर निविदा मागवण्याची प्रक्रिया केली जात आहे. निविदा आल्यानंतर आलेल्या कंपन्यांची क्षमता, विश्वासार्हता, त्यांचा दर आदींचा विचार करून काम देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
 सद्यपरिस्थितीत कचरा प्रक्रियेसाठी फक्त हंजर आणि रोकेम या कंपन्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी सध्याची असलेली कचरा प्रक्रिया क्षमता दुप्पट करावी लागेल. त्यासाठी प्रत्येक प्रभागात छोटे, तसेच पंधरा मध्यम आणि चार मोठे प्रकल्प सुरू करावे लागतील, असेही जगताप यांनी सांगितले.