काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण यांना शिवाजीनगरमधून पुन्हा उमेदवारी दिली गेली, तर या मतदारसंघात काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार उभा करावा, असा निर्णय शुक्रवारी आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात घेण्यात आला. काँग्रेसचा एकही कार्यकर्ता निम्हण यांच्या पाठीशी नाही आणि त्यांचा पराभव निश्चित आहे, असाही दावा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
आमदार निम्हण यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा गेले तीन महिने होती. मात्र, ही चर्चा आता थांबल्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर शिवाजीनगरमधील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी झाला. माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी महापौर दत्ता गायकवाड, नगरसेवक दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, नगरसेविका संगीता गायकवाड, तसेच जुबेर पीरजादे, आनंद छाजेड, प्रदीप खेडेकर, सोमेश्वर बालगुडे, शैलजा खेडेकर, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पक्षाने निम्हण यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी सर्व काँग्रेसजनांची मागणी असून ही भूमिका इच्छुकांच्या मुलाखती झाल्या तेव्हाच स्पष्ट केली आहे. यापुढे जाऊन आता पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशीच आमची भूमिका आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही श्रेष्ठींकडे व्यक्त केल्या आहेत. तरीही पुन्हा निम्हण यांना उमेदवारी दिली गेली, तर शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व निष्ठावान एकत्र येऊन उमेदवार उभा करतील. तसेच निम्हण यांच्यासाठी या मतदारसंघातील कोणीही निवडणुकीत काम करणार नाही, असे दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निम्हण यांच्या मागे एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. सध्या जे त्यांच्याबरोबर आहेत, ते कोथरूड मतदारसंघातील आहेत, असे सांगून गायकवाड म्हणाले, की गुंडगिरी, दादागिरी, मारहाण, शिवीगाळ ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे निम्हण सोडून कोणालाही उमेदवारी द्या, अशी आमची सर्वाची एकमुखी मागणी आहे.
शिवाजीनगरमधून लढण्यासाठी चार जण प्रामुख्याने इच्छुक असले, तरी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मिळून एकच उमेदवार देतील आणि सर्व जण त्याच्या पाठीशी उभे राहतील, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, स्वत:ला निष्ठावंत म्हणून दत्ता गायकवाड हे आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजवत आहेत, असा दावा शिवाजीनगर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश वाघ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. त्यांनी स्वार्थासाठी पक्ष खिळखिळा केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.